वसई-विरार शहरात पाणीबाणी

वसई-विरार शहरात पाणीबाणी

वसई, ता. १४ (बातमीदार) : वसई-विरार शहरात फेब्रुवारी महिन्यातच पाणीबाणी सुरू झाली असल्याने महिलावर्गातून आक्रोश सुरू झाला आहे. महापालिकेच्या नळाला पाणी येत नसल्याने अधिकचे पैसे देऊन पाणी खरेदी करावे लागत आहे. तसेच महिलावर्गाला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांमध्ये गंभीर स्थिती निर्माण होईल की काय, अशी भीती नागरिकांना सतावू लागली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील तुळिंज, श्रीराम नगर, धानीव बाग, मोरेगाव, विजय नगर, नगीनदास पाडा, काजू पाडा यासह वसई विरारमध्ये काही परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या ठिकाणी सामूहिक नळजोडणी अधिक असल्याने पाणी येण्याच्या वेळेपूर्वी महिला रांग लावत असतात; परंतु अनेकदा पाणी मिळत नाही किंवा काही वेळा कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे पुरेसे पाणी न मिळाल्याने निराश होऊन महिलांना पुन्हा माघारी फिरावे लागत आहे. एकीकडे वसई विरार शहरात कमी दाबाने, अनियमित पाणीपुरवठा होते. तसेच जलवाहिनीत वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे पाण्याचे वेळापत्रक कोलमडत आहे.
------
जलवाहिनी गळती रोखण्याची गरज
वसई विरार शहराला सूर्या, उसगाव, पेल्हार धरणातून पाणी पुरवठा होतो; परंतु जलवाहिनी फुटल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे पाणी वितरणावर परिणाम होतो. यावर पाणी विभागाने वेळीच उपाययोजना केल्यास वाया जाणाऱ्या पाण्याला रोखता येईल व शहराला पाणी योग्यरीत्या मिळेल, असे नागरिकांतून सांगण्यात आले.
-----
पाण्याची समस्या एक वर्षपासून भेडसावत आहे. उन्हाळ्यात अधिक हाल होत असतात. वसई विरार महापालिकेने मुबलक पाण्याचा पुरवठा करावा जेणेकरून दिलासा मिळेल.
- सोनी झा, रहिवासी
-----------------------
एप्रिल महिन्यात ‘सूर्या’चे पाणी
एमएमआरडीच्या सूर्या प्रादेशिक पाणी योजनेतून एप्रिल महिन्यात पाणी येण्याची शक्यता आहे. यातून शहरासाठी १८५ एमएलडी पाण्याची उपलब्ध होणार आहे, असे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी स्पष्ट केले आहे; परंतु दीड महिन्यात पाण्याचे नियोजन कसे करणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
-----------------------------
वसई : पाणी भरण्यासाठी आणलेले हंडे-कळशा रिकाम्याच.

...........

पाणीटंचाईवर बविआ आक्रमक
नालासोपारा (बातमीदार) : विरार पूर्व परिसरात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक, सभापती यांनी तीव्र संताप व्यक्त करीत, तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा पालिका प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देत बविआच्या शिष्टमंडळाने मंगळवारी आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावर लवकरच हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी सांगितले.
विरार पूर्व मनवेलपाडा, कारगिल नगर, स्टेशन परिसर, फुलपाडा, साईनाथ नगर, चंदनसार, या परिसरात मागच्या तीन वर्षांपासून तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. विवा जहांगीड परिसरात मोठी पाण्याची टाकी बांधली आहे; पण पाईपलाईनचे काम झाले नसल्याने पाणी येत नाही, तसेच मागच्या एक वर्षांची पाणीपट्टी सरसकट माफ करावी, अशा मागण्या बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केल्या आहेत. या शिष्टमंडळात बविआचे संघटक सचिव आजीव पाटील, माजी सभापती पंकज ठाकूर, माजी स्थायी समिती सभापती जीतूभाई शहा, प्रशांत राऊत, माजी सभापती चिरायू चौधरी, माजी नगरसेविका मीनल पाटील, संगीता भेरे यांच्यासह अन्य महिला पुरुष पदाधिकारी यांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com