सेन्सेक्स ३१६ अंश घसरला

सेन्सेक्स ३१६ अंश घसरला

मुंबई, ता. १७ ः जागतिक शेअर बाजारांमधील नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारांनी आज (ता. १७) घसरण दाखवत तीन दिवसांची तेजी संपवली. आज सेन्सेक्स ३१६.९४ अंश; तर निफ्टी ९१.६५ अंशांनी घसरला.
आजच्या घसरणीत निफ्टीने अठरा हजारांचा स्तर खालच्या दिशेने तोडला, तर सेन्सेक्स कसाबसा ६१ हजारांवर टिकून राहण्यात यशस्वी ठरला.

आज जागतिक शेअर बाजार मंद असल्यामुळे सेन्सेक्स व निफ्टी व्यवहारांना सुरुवात होतानाच थंड होते. त्यानंतर सकाळी त्यांनी थोडा वेळ नफा दाखवला. पण तेथून नंतर त्यांच्यात घसरण सुरू झाली. मात्र, शेवटच्या तासातील खरेदीमुळे तोटा थोडा कमी झाला; तरी दिवसअखेर सेन्सेक्स ६१,००२.५७ अंशांवर; तर निफ्टी १७,९४४.२० अंशांवर स्थिरावला.

अमेरिकेत चलनवाढीचा वेग जास्त झाल्यामुळे तेथील फेडरल बँक कठोर धोरण स्वीकारण्याच्या भीतीने आज जागतिक शेअर बाजार थंड होते; तर देशांतर्गत मागणी थोडी घटल्यामुळे आणि चलनवाढीमुळे कंपन्यांचा नफा कमी होईल, ही भीती सतावत आहे. त्यातही देशांतर्गत खप अजून कमी झाला, तर ते चिंतेचे कारण होईल, अशी प्रतिक्रिया शेअर दलाल देत होते. या चिंतेमुळे आज निर्देशांकांच्या प्रमुख शेअरमध्ये विक्री झाली. फक्त कॅपिटल गुड्स क्षेत्राचे शेअर तेजीत होते. परकीय वित्त संस्थांनी या आठवड्यांत ८७ कोटी डॉलर मूल्याचे शेअर खरेदी केल्यामुळे थोडा उत्साह होता. मात्र, पुन्हा देशांतर्गत परिस्थितीमुळे चिंतेचे सावट बाजारावर होते.
---
शेअर्सचे चढउतार
आज निफ्टीच्या प्रमुख ५० पैकी ३३ शेअरचे भाव तोट्यात होते; तर सेन्सेक्सच्या मुख्य ३० पैकी २२ शेअर तोटा दाखवत होते. निफ्टीमधील अदाणी एंटरप्राइज चार टक्के; तर इंडसइंड बँक व नेस्ले हे शेअर सुमारे तीन टक्क्यांच्या आसपास घसरले. एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ या शेअरचे भावही घसरले; तर निफ्टीमधील लार्सन अँड टुब्रो अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर दोन टक्के वाढले, तर हिरो मोटर कॉर्प, एशियन पेंट, ग्रासिम या शेअरचे भावही वाढले. सेन्सेक्समधील महिंद्र आणि महिंद्र, स्टेट बँक, कोटक बँक, टीसीएस, एचसीएल टेक, सन फार्मा, ॲक्सिस बँक या शेअरचे भाव एक ते दोन टक्का घसरले.
...........
आता भारतीय शेअरबाजारांना दिशा दाखवण्यासाठी देशांतर्गत प्रमुख कारणे नसल्यामुळे जागतिक संकेतांवरच भारतीय शेअर बाजार अवलंबून आहे. उलट अमेरिकेची अवस्था पाहता तेथे व्याजदर दीर्घकाळ चढेच राहतील, अशी चिन्हे दिसत आहेत.
- विनोद नायर, जिओजिट फायनान्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com