आत्महत्या करणाऱ्याचे पोलिसांनी वाचवले प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या करणाऱ्याचे पोलिसांनी वाचवले प्राण
आत्महत्या करणाऱ्याचे पोलिसांनी वाचवले प्राण

आत्महत्या करणाऱ्याचे पोलिसांनी वाचवले प्राण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : कर्तव्य दक्षतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे प्राण वाचण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. नैराश्यमुळे आत्महत्येचा त्याने प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. तो आत्महत्येच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला कर्जतमधून ताब्यात घेतले.

शुक्रवारी (ता. १७) संध्याकाळी ७.३८ वाजण्याच्या सुमारास २६ वर्षीय तरुणाने त्याच्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत, तो आत्महत्या करत आहे. त्याला अवयव दान करायचे आहे. मृत्यूपूर्वी शरीरदान करेन, असे लहानपणीच ठरवले होते. करिअरमध्ये सतत अपयश येत असल्याने हे पाऊल उचलत आहे, असे म्हटले होते. समाज माध्यमावर ट्विट व्हायरल होताच या बाबतची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखा, मुंबई यांचे नेतृत्वात गुन्हे शाखा आणि वेस्ट सायबर पोलिस ठाणे यांची संयुक्त पथके तयार करून तपास सुरू झाला. आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाबाबत पथकाने तत्काळ तांत्रिक विश्लेषण करून माहिती गोळा केली आणि त्याला कर्जत रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. त्याचे समुपदेशन करून आत्महत्येपासून परावृत्त करत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मुलाचा जीव वाचवल्याबद्दल त्यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले.

कर्जाच्या हफ्त्यांमुळे नैराश्‍येत
तरुणाकडे पोलिसांनी विचारणा करता तो बारावी सायन्स उत्तीर्ण असून सध्या नोकरीच्या शोधात आहे. त्याने कोरोना काळात वडिलांच्या उपचाराकरिता वर दैनंदिन गरजांकरीता वेगवेगळ्या खासगी संस्थांकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचे हफ्ते व घरखर्च भागवू शकत नसल्याने नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्येचा विचार करत होता आणि मरणापूर्वी अवयव दान करावयाचे असल्याचे त्याने सांगितले.