‘जागृत पालक, सुदृढ बालक’द्वारे आजारी बालकांवर उपचार

‘जागृत पालक, सुदृढ बालक’द्वारे आजारी बालकांवर उपचार

जव्हार, ता. २० (बातमीदार) : तालुक्यातील आदिवासी भागात आरोग्य सुविधा ही चार प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या उपकेंद्रामार्फत पुरवण्यात येत आहे. यासाठी अंगणवाडी सेविका, प्रवर्तक, आशा सेविका कार्यरत आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात ९ फेब्रुवारीपासून ‘जागृत पालक, सुदृढ बालक’ या मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागात आठवडाभरात ० ते १८ वयोगटातील सहा हजार ७८२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
पालकांना जोपर्यंत बालकाला कुठे दुखत खुपत नाही तोपर्यंत एखाद्या त्याला काय त्रास होतो आहे, हे समजत नाही. एखाद्या आजाराचे किंवा त्रासाचे वेळेत निदान झाले, आणि त्यावर उपचार झाले तर त्यातून उद्‌भवणारा धोका टाळता येतो. यासाठी ० ते १८ वयोगटातील बालकांची डोक्यापासून ते पायापर्यंतची तपासणी केली जात आहे. या तपासणीसाठी बाल आरोग्य तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे. तालुक्यातील ३४ पथकांद्वारे शासकीय, निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, खासगी शाळा, आश्रम शाळा, अंधशाळा, अंगणवाड्या, कर्णबधिर शाळा,वसतिगृहे येथील विद्यार्थ्यांची तपासणी सुरू झाली आहे.
या मोहिमेअंतर्गत आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे रक्तदाब व तापमान मोजणे, नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा आदी आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखणे, तसेच, ऑटीझम, विकासात्मक विलंब इत्यादींच्या संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्वरित उपचार केली जाणार आहे. तर किशोरवयीन मुला-मुलींमधील शारीरिक / मानसिक आजार शोधून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार केले जातील, असेही तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले आहे.

तपासणी झालेली बालके
० ते ६ वर्ष - ४०२२
६ ते १० वर्ष - १६२४
१० ते १८ वर्ष - ११३६

तपासणी पथके - ३४
तपासलेल्या शाळा - ४८
तपासलेल्या अंगणवाडी - ७७
तपासलेली मुले - ६,७८२

अभियानाची उद्दिष्टे
१.प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे
२.सुस्थितीत व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे
३. आजारी बालकाला त्वरित उपचार देणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com