ठाण्यात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ

ठाण्यात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ

स्नेहा महाडिक
ठाणे, ता. १९ (वार्ताहर) : अंगावर थुंकला म्हणून डोके फोडले, चारित्र्याच्या संशयावरून हत्या, अनैतिक संबंधातील अडचण दूर करण्यासाठी खून, कुठे भांडण सोडवणाऱ्यावरच हल्ला अशा प्रकारच्या ठाणे पोलिस आयुक्तालयामध्ये गेल्या दोन वर्षांत १७२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. हत्या आणि खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे उकल करण्यात ठाणे पोलिसांना यश येत असले, तरी अगदी क्षुल्लक कारणावरूनही जीवावर उठण्याच्या प्रवृत्तीत झालेली ही वाढ चिंताजनक आहे.

मुंबई पोलिसांनंतर ठाणे पोलिसांच्या कामगिरीची दखल घेतली जाते. आतापर्यंत अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यापासून ते कुख्यात गँगस्टरला जेरबंद करण्यापर्यंत ठाणे पोलिसांनी कामगिरी बजावली आहे; पण गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये वाढत्या लोकसंख्येप्रमाणे गुन्हेगारीतही वाढ होताना दिसत आहे. पाच परिमंडळात विविध पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांव्यतिरिक्त लूट, जबरी लूट, मारहाणीचे गुन्हे, विनयभंग, अत्याचाराचे गुन्हे अशा विविध प्रकारच्या शेकडो गुन्ह्यांची नोंदी झालेल्या आहेत.
सन २०२१मध्ये पाच परिमंडळाच्या हद्दीत ८९ खुनाचे गुन्हे नोंद झाली; तर ७६ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या वर्षामध्ये खुनाच्या प्रयत्नाची १२३ गुन्ह्यांची नोंद झाली असून १११ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. २०२२ यावर्षात मात्र खुनाच्या गुन्ह्यात वाढ होत आकडा ९३वर गेला आहे. त्यापैकी ८५ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत; तर या वर्षात हत्येच्या प्रयत्नाच्या १४० गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापैकी ११९ गुन्ह्यांची उकल करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. यावर्षी २०२३ च्या पहिल्या महिन्यातच खुनाचे चार गुन्हे दाखल झाले असून १३ गुन्हे हे हत्येच्या प्रयत्नाचे आहेत. यापैकी काही प्रकरणे ही क्षुल्लक कारणावरून घडल्याचे निदर्शनास आले आहे; तर पूर्ववैमन्यसातून किंवा मालमत्तेच्या वादातूनही हत्या झाल्या आहेत. काही हत्या या राजकीय कारणावरून झाल्याचा संशयही व्यक्त होत आहे.

---------------------------
कोविडनंतर गुन्हेगारीच्या आकडेवारीत वाढ
कोविडनंतर सन २०२१च्या तुलनेत प्रत्येक गुन्ह्यात सन २०२२ या वर्षात वाढ झाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटना घटल्या असल्या, तरी काही ठराविक शहरांमध्ये मागील दोन वर्षांत गोळीबाराच्या आणि हत्येच्या घटनांनी वेग घेतला असल्याची आकडेवारीतून स्पष्ट होते.


सन २०२२ वर्षाची आकडेवारी

===================================
महिना हत्या गुन्ह्यांची नोंद हत्येचा प्रयत्न नोंद
संख्या.........उकल संख्या.........उकल ===============================
जानेवारी ०९ ०९ १२ १२
फेब्रुवारी ०७ ०७ १६ १४
मार्च ०५ ०३ १८ १७
एप्रिल १२ ११ ०६ ०६
मे ०६ ०६ १६ ११
जून ०६ ०६ ०७ ०५
जुलै ०५ ०४ ०५ ०४
ऑगस्ट ०७ ०६ ११ १०
सप्टेंबर १२ १२ १३ १०
आक्टोबर ०७ ०६ १६ १३
नोव्हेंबर ०७ ०६ १० ०८
डिसेंबर १० ०९ १० ०९
============================================================
एकूण - ९५ ८५ १४० ११९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com