
किसन कथोरेंच्या निषेधार्थ चारोटीत मोर्चा
कासा, ता. २० (बातमीदार) : आमदार किसन कथोरे यांनी आदिवासी जनसमुदायाचे रोजगार व आरक्षण काढून टाकण्यासंबंधी केलेल्या मागणीच्या निषेधार्थ सोमवारी चारोटी टोल नाका येथे आंदोलन करण्यात आले. यात भूमी सेना व आदिवासी एकता परिषदेतर्फे निषेध करून टोल नाका काही काळ बंद करून आमदार किसन कथोरे व शासनाचा निषेध करण्यात आला.
कथोरे यांनी अनुसूचित क्षेत्रातील १७ पदांच्या नोकर भरतीत अनुसूचित जाती व इतर मागासवर्ग, तसेच खुल्या वर्गातील उमेदवारांना संधी मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे केल्याने मूळ निवासी आदिवासी समाजावर अन्याय होणार आहे. या निषेधार्थ चारोटी टोल नाका येथे भूमी सेना व आदिवासी एकता परिषदेकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. सोमवारी सकाळी चारोटी नाक्यावरून चालत घोषणा देत हा मोर्चा टोल नाक्यावर आला. तेथे सर्व कार्यकर्त्यांनी काही काळ सर्व लेन रोखून धरल्या. यावेळी आदिवासी एकता परिषदेचे कार्याध्यक्ष श्यामसुंदर चौधरी म्हणाले की, येथील जंगल, जमीन, पाणी यांच्यावर आमचा हक्क आहे. त्याचबरोबर विविध नोकर भरतीत आमचे आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे. यासाठी आदिवासी समाज आवाज उठवत आहे.
यावेळी भूमी सेनेचे कार्यकर्ते भरत वायडा यांनी या सरकारचा निषेध करताना आमच्या हक्काच्या जागा हिरावून घेण्याच्या या सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत. डहाणू परिसरात विनाशकारी प्रकल्पांमुळे आदिवासी जनसमुदाय याला बेदखल केले जात आहे, असे सांगितले. या निषेध मोर्चामध्ये कासा, चारोटी, वेती, वरोती, वाणगाव परिसरातून आदिवासी कार्यकर्ते सहभागी झाले होते. कासा पोलिस ठाणे अधिकारी श्रीकांत शिंदे यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. त्याचबरोबर महामार्ग पोलिस सहनिरीक्षक एस. सय्यद व टोल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.