वसईत रिक्षांमुळे वाट खडतर

वसईत रिक्षांमुळे वाट खडतर

वसई, ता. २१ (बातमीदार) : एकीकडे रस्ते अरुंद, त्यात वापर न होणाऱ्या स्काय वॉकचा अडथळा, उड्डाणपुल दिवास्वप्न ठरत आहेत. अशात प्रवासी व खासगी वाहनांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असल्याने कोंडी रोखण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनासमोर येऊन ठेपले आहे. या सर्वांवर उपाययोजना केल्या जात असताना वाढलेल्या रिक्षांची संख्या कोंडीत भर घालत आहेत. प्रादेशिक परिवहन विभागने दिलेल्या आकडेवारीनुसार वसई-विरार शहरात गेल्या चार वर्षात १८ हजार रिक्षा परवाने वितरित झाले आहेत.
सकाळी लोकल पकडण्यासाठी असो किंवा घरी परतण्यासाठी वसई विरार शहरात सर्वसामान्य प्रवासी हा रिक्षांवर अवलंबून असतो. परंतु अनेकदा याच रिक्षा प्रवाशांची वाट अडवत असतात. तसेच अनेक रिक्षा अनधिकृतपणे चालवल्या जातात. यात कागदपत्र, लायसन्स नसताना अल्पवयीन मुले रिक्षा चालवत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहेत.
वसई, नालासोपारा आणि विरार शहरात वाहनांच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यात दुचाकी, चारचाकी, टेम्पो व रिक्षांची वर्दळ अधिक आहे. त्यातच वाहनतळांचा अभाव, रस्त्यालगतची बेवारस वाहने, फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक यंत्रणा कोलमडली आहे. एकीकडे महापालिका रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी कोट्यवधीचा खर्च करत आहे. पण अनेक रस्त्यांवर शोरूम, गॅरेजसह हॉटेलवाल्यांनी रस्ते अडवल्याने रस्ते अरुंद होत आहेत. परंतु पालिका प्रशासनाकडून याची कोणतीच दखल घेतली जात नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सध्या बेरोजगारांना रिक्षा व्यवसाय करता यावा म्हणून परवाने दिले जात आहेत. गेल्या चार वर्षाची आकडेवारी पाहता शहरातील रिक्षांमध्ये तब्बल १८ हजार परवाने धारकांची वाढ झाली आहे. व्यवसायासाठी परवाना मिळाल्याने व्यवसाय अधिकृत करता येत असला तरी सार्वजनिक ठिकाणची कोंडी, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांचे प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. यावर महापालिका आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने एकत्र येत उपाययोजना केल्यास नव्याने धावणाऱ्या रिक्षांमुळे अडथळा निर्माण होणार नाही.
----------------------------
१४५ रिक्षा तळांना मंजुरी
अवैध रिक्षा प्रवाशांची वाट अडवत आहेत. त्यातच प्रवासी वाहतूक करण्यासाठी रिक्षातळ नसल्याने चालकांना तसेच प्रवाशांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे उपप्रादेशिक विभागाने शहरात १४५ रिक्षा तळांना मंजुरी दिली आहे. याबाबत महापालिका फलक लावण्याची कार्यवाही करत आहे परंतु अद्याप रिक्षातळांचे काम पूर्ण झाले नाही. अशात रिक्षांमध्ये वाढ झाली असल्याने रिक्षातळाचा अभाव जाणवण्याची शक्यता आहे.
----------------------
शहरात रिक्षातळाची मोठी कमतरता आहे. प्रशासनाने याबाबत सर्वेक्षण केल्यानंतर रिक्षातळांना मजुरी मिळाली आहे. त्यामुळे व्यवसायाला चालना मिळणार आहे. परंतु प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अवैध रिक्षांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे.
- विजय खेतले, अध्यक्ष, ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघ
----------------------
उप्रादेशिक परिवहन विभागाकडे परवाने काढण्यासाठी अर्ज केले जातात. त्यानुसार आवश्यक असणारी कागदपत्रे तपासून छाननी केल्यानंतर नियमानुसार परवान्याची कार्यवाही केली जात असते. तसेच शहरात १४५ रिक्षातळांना देखील मंजुरी देण्यात आली आहे.
- दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com