बोर्डीरोड रेल्वे स्थानक सुविधांच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोर्डीरोड रेल्वे स्थानक सुविधांच्या प्रतीक्षेत
बोर्डीरोड रेल्वे स्थानक सुविधांच्या प्रतीक्षेत

बोर्डीरोड रेल्वे स्थानक सुविधांच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

वार्तापत्र

अच्युत पाटील, बोर्डी
तलासरी तालुक्याच्या विकासाला वरदान समजल्या जाणाऱ्या पश्चिम रेल्वेवरील बोर्डी रोड स्थानकाच्या परिसरातील प्रवासी व नागरिकांना २८ वर्षांनंतरही रेल्वे सुविधांपासून वंचित आहेत. अतिदुर्गम आणि आदिवासी लोकवस्ती असलेल्या या भागाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या पश्चिम रेल्वे मार्गावरील या रेल्वे स्थानकावरील दिवसभरातून फक्त चार पॅसेंजर गाड्या थांबतात. येथील प्रवाशांनी वेगवेगळ्या माध्यमातून रेल्वे मंत्रालय व केंद्र सरकारमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक नेत्यांकडे पाठपुरावा करूनही येथील प्रवाशांना न्याय न मिळालेला नाही.
बोर्डी रोड रेल्वे स्थानकात सकाळी सहा वाजता मुंबईकडे जाणारी वलसाड फास्ट पॅसेंजर सहसर्व शटल गाड्या तसेच सुरत मुंबईकडे जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस व शटल गाड्यांना थांबा द्यावा. तसेच चर्चगेट होऊन डहाणूपर्यंत येणाऱ्या उपनगरीय लोकल गाड्या बोर्डी रोड रेल्वेस्थानकापर्यंत वाढवाव्यात, अशी मागणी या भागातून केली जात आहे. मात्र रेल्वे मंत्रालयाने येथील प्रवाशांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. रेल्वे स्थानक परिसराच्या २० किलोमीटर परिसरात मोठ्या प्रमाणात फळलागवडीसह पर्यटन क्षेत्राचाही विकास झपाट्याने सुरू आहे. या रेल्वे स्थानकात जादा गाड्यांना थांबा दिल्यास येथील उत्पादित शेतमाल शहराकडे नेण्यास शेतकऱ्यांना लाभधारक ठरणार आहे. तसेच पर्यटन विकासासाठीदेखील याचा चांगला फायदा होईल.
तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव ग्रामपंचायत क्षेत्रात १९९४ साली पश्चिम रेल्वेवर बोर्डी रोड रेल्वे स्थानकाची स्थापना करण्यात आली आहे. घोलवड उंबरगाव रेल्वे स्थानकादरम्यान असलेले बोर्डीरोड रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील शेवटचे स्थानक असल्याने या स्थानकाला विशेष महत्त्व आहे. चर्चगेट डहाणूपर्यंत येणाऱ्या उपनगरी लोकल गाड्या बोर्डी रोड रेल्वे स्थानकापर्यंत आणण्यात याव्यात जेणेकरून महाराष्ट्राच्या शेवटच्या स्थानक परिसरातील प्रवाशांना न्याय मिळेल आणि दळणवळाचे साधन उपलब्ध होईल, अशी आशा या भागातील प्रवासी व्यक्त करीत आहेत. या स्थानकापासून तलासरी तालुक्यातील मच्छीमारीसाठी प्रसिद्ध असलेले झाई, औद्योगिक प्रशिक्षण संस्था माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण यासाठी प्रसिद्ध बोरीगाव, तसेच अनेक शिक्षण संस्था या भागात विकसित होत आहेत. तसेच या परिसरातील सुमारे ५० हजार लोक वस्ती असून हजारो आदिवासी कामगार गुजरात आणि महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतीत रोजगार मिळवण्यासाठी ये जा करीत असतात. या कामगारांच्या प्रवासाच्या दृष्टीने हे रेल्वे स्टेशन अतिशय उपयोगी आहे. मात्र अपुऱ्या सुविधांमुळे या सर्व कामगारांना खाजगी वाहनाचा पर्याय स्वीकारण्याची पाळी आली आहे.
बोर्डी रोड रेल्वे स्थानकाची स्थापना झाल्यापासून येथे मुंबईकडे जाणाऱ्या दोन व वापीकडे जाणाऱ्या दोन मिळून फक्त चार गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. भविष्यात प्रवाशाची वर्दळ वाढल्यानंतर अधिक गाड्यांचा थांबा देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र रेल्वे मंत्रालयाने येथील प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने रेल्वे स्थानक असूनही रेल्वे गाड्यांना थांबा मिळत नसल्यामुळे प्रवाशांना खाजगी गाड्यांचा आसरा घ्यावा लागत आहे.