बेसुमार उत्खननाने जीव टांगणीला

बेसुमार उत्खननाने जीव टांगणीला

मनोर, ता. २१ (बातमीदार) : पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील लालोंढे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांचा विरोध झुगारून दगडखाणी आणि स्टोनक्रशर मशीन सुरू करण्यात आले आहेत. दगडखाणीविरोधातील ठरावाची माहिती महसूल विभागाला दिल्यानंतरही सुरू असलेल्या दगडखाणीमधून मर्यादेपेक्षा अधिक खोलीवर दगडाचे उत्खनन केले जात आहे. दगड उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या मोठ्या क्षमतेच्या सुरुंगस्फोटांच्या हादऱ्यांमुळे राहती घरे धोकादायक झाली आहेत.

दिवसरात्र सुरू असलेल्या क्रशर मशीनमुळे धूळ आणि ध्वनिप्रदूषणामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. आदिवासी पाड्यांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या खाणीतून उत्खनन सुरू असल्याने रस्ता धोकादायक झाला आहे. खोल गेलेल्या खाणींमुळे भूजलपातळी खालावली आहे. दगडखाणी आणि क्रशर मशीनमुळे लालोंढे गाव आणि आदिवासी पाड्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याने कारवाईची मागणी जोर धरत आहे. लालोंढे गावातील गावठाण पाडा, फरले पाडा आणि पद्माच्या पाड्यात सुमारे आठ ते दहा दगडखाणी आणि तीन ते चार क्रशर मशीन सुरू आहेत.

दगड उत्खननामुळे काही खाणी साठ ते सत्तर मीटर खोल झाल्या आहेत. कमी वेळात मोठ्या प्रमाणात दगड उत्खननासाठी खाणमालकांनी बोअर ब्लास्ट पद्धत वापरात आणली आहे. एका ब्लास्टमुळे मोठ्या प्रमाणात दगडाचे उत्खनन होत आहे; परंतु स्फोटांचे हादरे काही किलोमीटर अंतरावर जाणवत आहेत. खाणीलगतच्या आदिवासी पाड्यांमधील राहत्या घरांच्या भिंतींता तडे गेले असून स्फोटादरम्यान उडणाऱ्या दगडाच्या तुकड्यांनी घरांच्या छप्परावरील सिमेंटच्या पत्र्यांना भोके पडत असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत.

--------------------
दगडखाणी आणि क्रशरविरोधात ग्रामसभेत घेतलेला ठरावाची प्रत महसूल विभागाला देण्यात आली आहे. महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने दगडखाण आणि क्रशर सुरू आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खाणकाम सुरू असल्याने फरले पाड्याचा रस्ता धोकादायक झाला आहे. ग्रामपंचायती रस्त्याच्या कडेला सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
- भावना राऊत, ग्रामसेविका, लालोंढे

-----------------
खाणींमुळे अपघातांत वाढ
लालोंढे गावातील आदिवासी वस्ती असलेल्या फरले पाड्यात जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोलवर खाणकाम करण्यात आल्याने पाड्यात जाणार रस्ता धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात बुडून एका मुलीचा मृत्यू झाला होता. रस्त्यालगतच्या खोल खाणीत एक दुचाकी, इको कार आणि ट्रॅक्टर पडून अपघात झाले होते. रस्त्यालगत संरक्षण भिंत बांधण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

---------------
स्फोटकांची बेकायदा विक्री
दगडखाणींमध्ये स्फोट करण्यासाठी वापरली जाणाऱ्या स्फोटकांची बेकायदा विक्री केली जात आहे. स्फोटके विक्री करणारे विक्रेते विनापरवाना सुरू असलेल्या दगडखाणींना बेकायदा चढ्या भावाने स्फोटकांची विक्री करीत आहेत. बेकायदेशीर पद्धतीने उपलब्ध होणारी स्फोटके सूर्या नदीत मासेमारी करण्यासाठी वापरली जात असल्याचे समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com