पूर्व मुक्तमार्ग ते ग्रँट रोड नवीन उन्नत मार्ग

पूर्व मुक्तमार्ग ते ग्रँट रोड नवीन उन्नत मार्ग

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २२ : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरळीत व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेतर्फे नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. हा मार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीच्या मार्गांपैकी एक असणार आहे. ऑरेंज गेट पूर्व मुक्तमार्ग येथून ग्रँट रोडपर्यंत मौलाना शौकत अली मार्गावर हा उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. त्यानुसार पालिकेतर्फे आज निविदाही काढण्यात आली. तसेच या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करून लवकरात लवकर या मार्गाचे काम पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे.

मुंबईतील वाहतूक सेवा सुरळीत करण्यासाठी पालिका विविध योजना आखत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नवीन मार्गाची उभारणी करण्याचे प्रस्तावित केले आहे. या एकूण मार्गाची लांबी ही ५,६६० मीटर इतकी आहे. अंदाजे ७७०.८५ कोटी (जीएसटीसह) रुपये खर्च या मार्गाच्या उभारणीसाठी येणार आहे. ४२ महिन्यांच्या (पावसाळ्यासह) कालावधीसाठी निविदा मागविण्यात आली आहे. पूर्व मुक्त मार्गाच्या पी. डी. मेलो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित उन्नत मार्ग अत्यंत आवश्यक आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील नागरिकांचा प्रवास सुखकर होऊन मरिन ड्राईव्हच्या वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच नवी मुंबईतून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या वेळेची बचतही या मार्गामुळे होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

वाहतूक कोंडीतून सुटका
१) सद्यस्थितीत ग्रँट रोड ते पूर्व मुक्त मार्ग या ५.५६ किलोमीटर प्रवासासाठी ३० ते ५० मिनिटे इतका कालावधी लागतो; मात्र प्रस्तावित मार्गाच्या उभारणीनंतर हा वेळ ७ ते ८ मिनिटांनी कमी होऊन वाहतूक कोंडी टाळण्यास हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. तसेच सागरी किनारी रस्त्याला (कोस्टल रोड) पूर्व मुक्त मार्गाशी जोडण्यासाठीही हा मार्ग महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
२) डॉ. बी. आर. आंबेडकर रोड, रफी अहमद किडवाई मार्ग, पोर्ट ट्रस्ट क्षेत्र, पी. डी. मेलो रोड आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ग्रँट रोड परिसर, ताडदेव आणि मुंबई सेंट्रल या मुंबईतील मुख्य भागातील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी हा मार्ग आवश्यक ठरणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com