अंबरनाथचे शिवमंदिर पर्यटन नकाशावर

अंबरनाथचे शिवमंदिर पर्यटन नकाशावर

अंबरनाथ, ता. २२ (बातमीदार) : ९६३ वर्षांपूर्वीचे अंबरनाथ येथील शिलाहारकालीन शिवमंदिर आता देशाच्या पर्यटन आणि धार्मिक नकाशावर येणार आहे. या पुरातन मंदिराच्या परिसर विकासासाठी महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र सरकारने १३८ कोटी २१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. प्रवेशद्वार, नदी, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, अ‍ॅम्पी थिएटर, संरक्षक भिंत, क्रीडांगण, भक्तनिवास आदी विविध विकासकामे या निधीच्या माध्यमातून होणार आहेत.
अंबरनाथमधील स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेले जुने पुरातन शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण प्रकल्प तसेच शहरात सुरू असलेल्या आणि प्रगतीपथावर असलेल्या विविध विकास कामांची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार डॉ. बालाजी किणीकर यावेळी उपस्थित होते.
शिवमंदिर केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित असून राष्ट्रीय स्तरावर अंबरनाथची ओळख ‘टेम्पल सिटी’ म्हणून करण्यात आली आहे. शिवमंदिर देशभरातील प्रमुख धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळख होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मंदिर परिसराच्या विकासासाठी सरकारने १३८.२१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. प्राचीन शिवमंदिर ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. प्राचीन शिल्पाच्या धर्तीवर सुशोभीकरणाचे काम काळ्या पाषाणामध्ये केले जाणार आहे. विकास कामांच्या अहवालास सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी देखील मिळाल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
असे होणार सुशोभीकरण
९६३ वर्षे जुन्या असलेल्या शिवमंदिरापासून १०० मीटर अंतराबाहेर प्राचीन शिल्पाच्या धर्तीवर कामे केली जाणार आहेत. मंदिर परिसराच्या कामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंदिराच्या परिसरात प्रवेशद्वार, त्या समोरील चौकात नंदी, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, ॲम्‍पी थिएटर, भक्त निवास, चेक डॅम, वालधुनी नदीकिनारी संरक्षक भिंत आणि घाट यासारखी कामे करण्यात येणार आहेत. मंदिराच्या जवळून वाहणाऱ्या वालधुनी नदीचे पुनरुज्जीवन करण्याची योजना देखील अमलात आणली जाणार असल्याचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
अंबरनाथचे शिवमंदिर केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित असल्याने प्रकल्पातील कामे मंजुरीसाठी पुरातत्व विभागाची मंजुरी आवश्यक होती. त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्या कामगिरीचे खासदार शिंदे यांनी अभिनंदन केले. नवीन प्रशासकीय इमारत, नाट्यगृह, रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आदी विकासकामे शहरात सुरू असून महापालिका करू शकणार नाही, अशी विकास कामे पालिकेमार्फत सुरू असल्याचे खा. डॉ. शिंदे म्हणाले.
-----------------------------------------
काशी विश्वेश्‍‍वर मंदिराच्या धर्तीवर विकास
गेल्या काही वर्षांपासून शिवमंदिर परिसरात होणारा शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल १६ ते १९ मार्च या कालावधीत होणार असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. कोरोनाच्या संकटकाळामुळे दोन वर्षे फेस्टिव्हल होऊ शकला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे काशी विश्वेश्‍‍वराच्या मंदिराचा विकास केला, त्याचप्रमाणे अंबरनाथच्या शिवमंदिर परिसराचा विकास होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com