एलईडीमुळे महापालिकेच्या ९ कोटींची बचत

एलईडीमुळे महापालिकेच्या ९ कोटींची बचत

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार नवी मुंबई महापालिकेने सोडियम व्हेपरचे दिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसवण्याचे काम हाती घेतले आहे. एप्रिलपर्यंत शहरातील दिव्यांची जागा एलईडी दिव्यांनी घेतल्यानंतर महिन्याला तब्बल साडेसात लक्ष युनिटची बचत होणार असून वर्षाला महापालिकेची नऊ कोटींची बचत होणार आहे.
वीज बचत व पर्यायाने वीज देयकांमध्ये बचत होण्याच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने शहरातील जुने सोडियम व्हेपरचे दिवे बदलून त्या ठिकाणी नव्याने एलईडी दिवे लावण्याबाबत निविदा काढल्या होत्या. नवी मुंबई महापालिका क्षेत्रांतर्गत असलेल्या आठ विभागांतील तब्बल ३५ हजार सोडियम व्हेपरचे दिवे बदलण्याच्या या निविदेत पाच वर्षे देखभाल-दुरुस्तीच्या कामाचा समावेश असून त्याला सुमारे ३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय नवी मुंबई महापालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सायन-पनवेल महामार्गावर १८०० एलईडी दिवे बसवण्यासह महामार्गावरील २९ हायमास्टची पुढील पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती करिता नवी मुंबई महापालिकेच्या विद्युत विभागाने स्वतंत्र निविदा काढली आहे.
--------------------------------
४० टक्के विजेची बचत
तुर्भे विभागामध्ये एकूण ५,९४० एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. यापूर्वी या विभागात सोडियम व्हेपरचे दिवे असताना मासिक ३ लाख १६ हजार युनिट वीज लागत होती. मात्र, आता या विभागात एलईडी दिवे बसवल्यामुळे सध्या १ लाख ९० हजार युनिट वीज लागत आहे. यावरून तब्बल १ लाख २६ हजार युनिट विजेची बचत फक्त तुर्भे विभागामध्ये होत असल्याचे दिसून येते. याचा अर्थ जवळपास ४० टक्के विजेची बचत होत असल्यामुळे प्रतिमहिना बारा लाखांची बचत होत आहे.
---------------------------------------------
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील आठ विभागांपैकी परिमंडळ- १ अंतर्गत येणाऱ्या बेलापूर, नेरूळ, तुर्भे व वाशी या चार विभागांतील एलईडी दिवे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या परिसरातील वीज देयकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे.
- शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता, विद्युत विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com