मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे?

मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे?

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्यातील प्रत्येक क्षेत्र कोलमडले असून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे, असा प्रश्न येत्या अधिवेशनात शिंदे यांना विचारणार आहोत, असे आदित्य ठाकरे आज वरळीतील भाषणात म्हणाले.
वरळीतील बीडीडी चाळीतील लोकांची स्वप्नपूर्ती महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली. जांबोरी मैदानासाठी अडीच कोटींचा निधी दिला. वरळीतील एकही रस्ता किंवा ठिकाण नसेल जिथे महाविकास आघाडी सरकारमध्ये काम झाले नाही. त्यामुळे वरळीतील नागरिकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर विश्वास आहे; मात्र नऊ महिने होऊनही एकनाथ शिंदे सरकारचे काम दिसत नाही. दिल्लीला धावा करत आहेत. विस्तार कधी होईल याची विचारणा करत आहेत; मात्र विस्तार होण्यापूर्वीच हे सरकार कोसळेल, अशी टीका आदित्य यांनी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दक्षिण मुंबई विभागातील वरळीतील जांबोरी मैदानात शिवसैनिक निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मेळाव्यातील कार्यकर्त्यांना संबोधताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारवर टीका केली. राज्यात पोलिस भरती, एमपीएससी भरती रखडली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका थांबवून प्रशासक बसवले आहेत. त्यामुळे असे भयानक सरकार महाराष्ट्रालाच नाही तर देशासाठी धोक्याचे असून या सरकारमुळे लढून मिळवलेले स्वातंत्र्य धोक्यात आले असल्याची टीकाही त्यांनी केली.
...
शिवसैनिक आमच्यासोबत!
गद्दारांनी पक्षाचे नाव, चिन्ह सगळे काही नेले; पण आज वरळीकरांनी दाखवून दिले की आमचे शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. वरळीत यापूर्वी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत खुर्च्यांची गर्दी होती; तर या सभेला शिवसैनिकांची गर्दी आहे, असेही यावेळी ठाकरे म्हणाले.
...
आधी ईडीचे, आता बीसीचे सरकार!
शिंदे-फडणवीस यांचे आधी ईडीचे सरकार होते. आता बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टरचे सरकार झाले आहे. प्रत्येक कामामध्ये घोटाळे सुरू आहेत. मर्जीतल्या लोकांना कंत्राटे दिली जात आहेत, अशी टीकाही आदित्य यांनी या वेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com