
ठाणे स्थानकाने घेतला मोकळा श्वास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : प्रशासनाने एकदा काही करायचे ठरवले आणि त्याची अंमलबजावणी गांभीर्याने केली तर काय चमत्कार घडू शकतो याचा सुखद अनुभव सध्या ठाणे स्थानक परिसरात येत आहे. ठाणे पालिका आणि वाहतूक विभागाच्या संयुक्त कारवाईमुळे स्थानक परिसराची फेरीवाला आणि मुजोर रिक्षाचालकांच्या गराड्यातून सुटका झाली आहे. कधी नव्हे ते रस्ते मोकळे झाले असल्याने चाकरमान्यांनीही मोकळा श्वास घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानानंतर्गत शहराचा कायापालट करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, फेरीवाले आणि मुजोर रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे ठाणे स्थानक परिसराला बकाल स्वरूप जैसे थे होते. अखेर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पुढाकार घेत वाहतूक विभागासोबत संयुक्त कारवाईचे संकेत दिले. त्याबाबत बैठक घेत सर्वप्रथम फेरीवालामुक्त स्थानक बनवले. त्यानंतरही रिक्षावाल्यांची दादागिरी कायम होती. याबाबत ‘सकाळ’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आयुक्तांनी पुन्हा वाहतूक विभागाला सूचना दिल्या. त्यानंतर आठवडाभरापासून वाहतूक विभागाने विशेष पथके तैनात केली आहेत. त्यानुसार शेअर रिक्षांना स्थानकात नो एण्ट्री देण्यात आली आहे. त्यामुळे घुसखोरी करत प्रवाशांची पळवापळवी करणाऱ्या निम्म्याहून अधिक रिक्षावाल्यांच्या मनमानीला ब्रेक लागला. त्यामुळे स्थानक परिसर स्वच्छ आणि सुटसुटीत दिसत आहे.