
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी पालघरमध्ये बेमुदत उपोषण
पालघर, ता. २८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त शेतकरी, सर्व स्तरांवरील लोकप्रतिनिधी, नागरिक उत्स्फूर्तपणे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत.
पालघर जिल्ह्यात अनेक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन करण्यात आले; मात्र त्यांचे योग्य ते पुनर्वसन झालेले नाही. तसेच विक्रमगड, मोखाडा, जव्हार, वाडा हे तालुके आजही तहानलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींवर धरण, मध्यम जलप्रकल्प उभारले जात आहेत, पण त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आलेल्या जमिनीवरील अतिक्रमण हटवावे, बुलेट ट्रेन बाधितांना शंभर टक्के अनुदान देऊन त्यांचे पुनर्वसन प्रथम करावे, मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.