आजारी वडिलांवरील उपचारासाठी मुलाची चोरी

आजारी वडिलांवरील उपचारासाठी मुलाची चोरी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली ता. २८ : वडील आजारी असल्याने खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्याने तरुणाने चोरीचा मार्ग निवडला. डोंबिवलीतील एका घरातून त्याने सहा लाखांची चोरी केली; मात्र सीसी टीव्ही चित्रीकरणामुळे विष्णूनगर पोलिसांनी त्याला मुरबाडमधून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी पाच लाख ९२ हजारांचा माल जप्त केला.

मुरबाडमधील माझगाव ठुणे येथे वैभव मुरबाडे (वय २१) राहतो. त्याचे वडील आजारी असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचा खर्च भागवण्यासाठी त्याच्याजवळ पैसे नसल्याने वैभवने चोरी करण्याचे ठरवले. डोंबिवली पश्चिमेतील एका घरातून त्याने पाच लाख ९२ हजारांचे दागिने चोरले. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली. यामध्ये वैभव चोरी करून जात असल्याचे समोर आले. तसेच त्याने डोंबिवलीतील एका व्यापाऱ्याला हे चोरीचे दागिने विकले होते. या सर्व तांत्रिक बाबी तपासत विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याची ओळख पटवत मुरबाडमधून अटक केली. या चोरीमध्ये त्याच्या अल्पवयीन साथीदाराचादेखील सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com