ठाण्यात फेरीवाल्यांची पुन्हा दहशत

ठाण्यात फेरीवाल्यांची पुन्हा दहशत

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : दोन वर्षांपूर्वी खळबळ उडवून दिलेल्या पालिका अधिकारी कविता पिंपळे हल्ला प्रकरणानंतर आता फेरीवाला हप्तेवसुलीतून झालेल्या हत्येमुळे ठाणे पुन्हा एकदा हादरले आहे. फेरीवाला धोरण अंमलबजावणीसाठी होणारा विलंब, बेकायदा फेरीवाल्यांचे वाढते प्रस्थ, त्यांच्यावरील थातूरमातूर कारवाई आणि पालिका कर्मचाऱ्यांपासून ते राजकीय गुंडांपर्यंत होणारी हप्तेवसुली हे सर्वच मुद्दे या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. यातही फेरीवाल्यांचा ‘डॉन’, ‘गॉडफादर’ कोण अशी वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याने त्यातूनच हत्येपर्यंत मजल पोहचली आहे. पालिका प्रशासन आणि पोलिसांनी यावर वेळीच अंकुश लावला नाही तर भविष्यात फेरीवाल्यांमध्ये गँगवॉर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सप्टेंबर २०२१ मध्ये माजिवडा येथे ठाणे पालिका अधिकारी कविता पिंपळे यांच्यावर कारवाईदरम्यान फेरीवाल्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात पिंपळे यांच्या हाताची बोटे छाटली गेली होती. त्यानंतर फेरीवाल्यांविरोधात पालिकेने मोहीम हाती घेत व्यापक कारवाईला सुरुवात केली, पण हे प्रकरण थंड होताच फेरीवाल्यांचे बस्तान पुन्हा वाढले. दरम्यान, बेकायदा फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली करताना पालिकेच्याच तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे फेरीवाल्यांच्या दादागिरीनंतर हप्ते वसुलीचा मुद्दाही ऐरणीवर आला. पालिकेचे आयडी कार्ड गळ्यात घालून फेरीवाल्यांकडून दहा रुपयांची पावती फाडताना या कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाई व्यतिरिक्त काहीच झाले नाही. त्यानंतर हे प्रकरणही थंड पडले, पण दुसरीकडे हप्ते वसुली कायम राहिली.

-------------------------------------------
वसुलीतही वर्चस्वाची लढाई...
ठाणे महापालिकेच्या रेकॉर्डवर पाच हजार फेरीवाले असले तरी त्यांची संख्या ही लाखोंच्या घरात पोहचली आहे. ठाणे स्थानक ते सर्व प्रभागांतील गल्ली-बोळातील रस्ते फेरीवाल्यांनी अडवले आहेत.

राजकीय आणि पालिकेचा वरदहस्त मिळावा यासाठी नियमित हप्तेही पोहचवले जातात. आता हप्ते वसुलीतही वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी रवींद्र परदेशी यांची याच कारणावरून हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रवींद्र परदेशी यांचा मोठा भाऊ बारक्या ऊर्फ राजेंद्र परदेशी हा फेरीवाला हप्ते वसुली रॅकेट चालवत होता. मात्र, बारक्याच्या मृत्यूनंतर हे रॅकेट चालवण्याचा प्रयत्न रवीने केला. पुढे त्याला राजकीय आश्रय मिळाला. त्यामुळे त्याच्याविरोधात काही फेरीवाल्यांमध्ये रोष वाढला आणि वर्चस्वाच्या लढाईने हत्येचे रूप घेतले.
-------------------------------------------------------------
रोज दोन कोटींचा गल्ला
फेरीवाल्यांकडून नियमित हप्ता वसुलीसाठी मोठे रॅकेट सक्रिय आहे. रोजच्या रोज ही वसुली होत असून, त्यातून सुमारे दोन कोटी रुपयांचा गल्ला जमा होत असतो. मग या वसुलीची वाटणी होते.
--------------------------------------------
वसुलीचे रेटकार्ड
फेरीवाल्यांकडून मिळालेल्या ऑफ द रेकॉर्ड माहितीनुसार वसुलीचा रेटकार्ड हा ठरलेला असतो. त्यानुसार टोपली घेऊन भाजी विकणाऱ्यांकडून २० रुपये, हातगाडीवाल्यांकडून ५० रुपये, कपडे विकणाऱ्यांकडून शंभर रुपये, खाऊ विक्रेत्यांकडून १५० ते २०० रुपये हप्ता वसुली होते.
----------------------------------------
कोट
रवींद्र परदेशी हा बारक्या ऊर्फ राजेंद्र परदेशी या गुंडाचा लहान भाऊ होता. या हत्येत राजकीय पडसाद नसून फेरीवाल्यांच्या वर्चस्वाच्या स्पर्धेतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
- जयराज रणवरे (वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक, ठाणे नगर, पोलिस ठाणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com