पाणीटंचाईचे सावट

पाणीटंचाईचे सावट

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : ठाणे जिल्ह्यात उष्णतेचा पारा चढला असून असह्य उष्म्यामुळे जनता हैराण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा बसत असून धरणांतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत बारवी आणि भातसा धरणातील पाणीसाठा हा अनुक्रमे पाच ते तीन टक्क्यांनी खाली आला आहे; तर मध्य वैतरणामध्ये केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची खालावलेली पातळी पाहता पाणीकपातीचे संकट जिल्ह्यावर घोंगावू लागल्याचे दिसते. सध्याच्या घडीला पाणीकपात केली जात नसली तरी देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवणे आणि त्यानंतर पुरवठ्यावर होणारा परिणाम यामुळे फेब्रुवारीपासूनच अनेक भागांत पाणीटंचाईचा सामना नागरिक करत आहेत.

ठाणे जिल्ह्यात अनेक महत्त्वाची धरणे असूनही, फक्त जिल्ह्यासाठी स्वतंत्र असे धरण नाही. बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रश्न निकालात लागून धरणाची उंची वाढविण्यात आल्यानंतर जिल्ह्यावरील कायमस्वरूपी असणारे पाणीकपातीचे संकट दूर झाले आहे, असे म्हणण्यास हरकत नाही; परंतु वाढती लोकसंख्या पाहता हे धरण देखील आता अपुरे पडू लागले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्याला उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या असून, पारा चाळिशीच्या आसपास राहत आहे. कडक उन्हाळ्यासह नागरिकांना पाणीटंचाईची समस्याही सतावू लागली आहे. उन्हामुळे पाण्याच्या पातळीत घट होत असल्याचे धरणांतील पाणीसाठ्यावरून दिसत आहे.
--------------------------------------
योग्य वेळी योग्य निर्णय
मार्च २०२२ मध्ये जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा हा २०२१ च्या पाणीसाठ्याच्या तुलनेत पाच ते सात टक्क्यांनी जास्त होता. यंदा मात्र पाच ते सात टक्क्यांची घट ही मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच दिसून येत आहे. १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडून दर पंधरा दिवसांनी पाण्याचा आढावा घेतला जात आहे. पावसाळ्यास अद्याप चार महिने शिल्लक असून, त्यानुसार योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील, असे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
----------------------------------------------
पाईपलाईन फुटण्याच्या घटनांमध्ये वाढ
लघु पाटबंधारे विभागाकडून कोणतीही पाणीकपात केली जात नसली तरी ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांत सध्या पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना बसत आहेत. ठाणे शहर, कल्याण ग्रामीण परिसराचा यामध्ये समावेश आहे.

स्थानिक प्राधिकरणाकडून शहरांना पाणीपुरवठा होत असतो. तेथील देखभाल-दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. शहरात अनेक ठिकाणी विविध विकासकामे सुरू आहेत. ही कामे सुरू असताना पाईपलाईनला धक्का बसून पाईपलाईन फुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरील गळतीचे प्रमाण जास्त असल्याची बाब यापूर्वी अनेकदा उघड झाली आहे. याचा एकंदरीत परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असून, पाणीटंचाईची समस्या नागरिकांना भेडसावत आहे.
-----------------------------------------
फेब्रुवारी महिन्यातील धरणांतील पाणीसाठा लक्षात घेता अद्याप तरी पाणीकपातीचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मार्च महिन्यातील पाणीसाठ्यावर विभागाचे लक्ष असून त्याद्वारे पुढील नियोजनाचा विचार केला जाईल.
- नरेंद्र महाजन, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग
---------------------------------------------
ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा

मार्च २०२३ मार्च २०२२

धरणे आजचा पाणीसाठा (दलघमी) टक्केवारी मागील वर्षी पाणीसाठा टक्केवारी

भातसा ५६७.६५ ६०.२५ ६०१.५३ ६३.८५

आंध्रा २०७.८६ ६१.२९ ६६.१६ १८.६२

मध्य वैतरणा ४४.३० २२.८९ १०९.५३ ५६.६०

बारवी १९७.४८ ५८.२८ २१६.५८ ६३.९२

मोडकसागर ३७.५५ २९.१३ ४५,९१ ३५.६१

तानसा ८४.८० ५८.४५ ६२.४८ ४३.६७
------------------------------------------------------------
लघु पाटबंधारे विभाग मंजूर पाणी कोटा (दललि)

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण १४०

स्टेम ठाणे ३१६

कल्याण-डोंबिवली महापालिका ३२०

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंबरनाथ ९०४

इतर संस्था ३४

ग्रामपंचायत १

रायगड पालिका विभाग १०

सिंचन ३०९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com