साथीच्या आजारांचे थैमान

साथीच्या आजारांचे थैमान

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ ः उन्हाळा सुरू होताच नागरिकांना उष्णतेच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गेले दोन महिने शहरात व्हायरल आजारांचे रुग्ण बळावले आहेत. शहरातील रहिवासी वसाहतींमध्ये सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागदेखील सतर्क झाले आहे.
महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांवर येणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे व्हायरल आजाराने बाधित असल्याचे आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने प्रामुख्याने ऋतू बदलण्याचे महिने असतात. या महिन्यात हिवाळा ऋतू संपून उन्हाळ्याची चाहूल लागते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात रात्री आणि सकाळी गारवा आणि दुपारनंतर अचानक कडाक्याचे ऊन पडत असल्यामुळे नागरिकांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे. हवामानात झालेल्या आमूलाग्र बदलाचा नवी मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांमध्ये आणि खासगी दवाखान्यांमध्ये सर्दी, ताप आणि खोकल्याने बेजार झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार व्हायरल आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यातच ५० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण सर्दी, खोकला आणि तापाचे आढळून आले आहेत. त्यात सर्वाधिक रुग्णसंख्या ही ऐरोली, कोपरखैरणे, दिघा, घणसोली, तुर्भे, वाशी, सानपाडा, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर या भागांत आढळत असल्याने आरोग्य विभागाच्या आशा वर्करच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.
---------------------------------------
खोकला जाता जाईना
सध्या बहुतांश नागरिकांना सर्दी, ताप या दोन आजारांपैकी खोकला हा त्रास अधिक होतो. गोळ्या-औषधे घेतल्यानंतर आठवडाभरात ताप आणि सर्दी बरी होते; परंतु खोकला जात नाही. अगदी दोन आठवड्यांपासून ते महिनाभर रुग्णांना खोकला असल्याचे लक्षणे दिसून येत आहे. खोकल्यामुळे श्वास घेणे, पोटातसुद्धा दुखायला लागते; परंतु अशा वेळेस रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही तपासण्या केल्यानंतर औषधे बदलून उपचार घेतल्यास बरा होतो.
---------------------------------------
उन्हाळ्यात हे उपाय करा
- जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते. अशा परिस्थितीत खाण्या-पिण्याच्या बाबतीत बदल करायला हवा. फळांमध्ये केळे हे फळ खायला हवे. यात ट्रीट्कोफॅन ॲसिड असते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. उन्हाळ्यात कलिंगड फळ विक्रीसाठी येते. हे फळ खाण्याआधी पाच ते सहा तास पाण्यात बुडवून ठेवायला हवे. त्यानंतर ते खाण्यासाठी वापरावे.
- आंबा हे फळ शरीराला कर्बोदके देते. तेव्हा तेसुद्धा पाण्यात बुडवून नंतर खावे. यात मायक्रो न्युटंट असतात. ही फळे खाल्ल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. उन्हाळ्यात साधारणतः घट्ट कपडे आणि सिंथेटिक कपडे परिधान करू नयेत. शरीरातून सुटणारा घाम कपड्यांनी शोषून न घेता बाहेर पडेल, असे कपडे परिधान करावेत.
- वातावरणात उष्णता असली, तरीसुद्धा व्यायाम केला पाहिजे. पाणी पिताना थंड पाणी घेऊ नये, साधारण पाणी घ्यायला हवे. जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्यायला हवे. चहा आणि कॉफी जास्त घेऊ नये. त्यामुळे डी-हायड्रेशन कमी होईल.
--------------------------------------------
शहरात गेल्या वर्षीपेक्षा यंदा सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले आहेत. नागरी आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या लक्षणांवरून उन्हाळा सुरू होण्याआधीच हे प्रमाण अधिक असल्याचे जाणवते. लवकरच महापालिकेतर्फे नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शिका जाहीर करण्यात येणार आहे.
- डॉ. प्रमोद पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महापालिका
---------------------------------
प्रदूषणामुळे धूलिकण घशात जाऊन श्वसननलिकेला त्रास होतो. मास्क लावल्यामुळे खोकला बरा होऊ शकतो. व्हायरल इन्फेक्शनची साथ असल्यामुळे मास्क लावणे अधिक चांगले आहे.
-डॉ. पल्लवी पटेकर, कन्सल्टंट इन्टर्लल मेडिसिन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com