पर्यावरणपूरक होळीसाठी बाजारपेठा रंगमय

पर्यावरणपूरक होळीसाठी बाजारपेठा रंगमय

डोंबिवली, ता. २ (बातमीदार) : होळी म्‍हणजे रंगांचा सण... कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर यंदा सर्वत्र होळी, धूलिवंदन निर्बंधमुक्त पद्धतीने साजरे केले जाणार आहेत. हा सण साजरा करण्यासाठी बच्‍चे कंपनीमध्‍ये जय्यत तयारी सुरू झाली आहे. डोंबिवली शहरातील बाजारपेठा रंगांच्‍या सणानिमित्त सजल्या असून, नागरिकांमध्‍ये प्रचंड उत्साह संचारल्‍याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक रंग आणि विविध आकर्षक पिचकाऱ्या दाखल झाल्या असून, त्‍याच्‍या खरेदीसाठी मुलांची झुंबड उडत आहे.

शहरातील बाजारपेठांमध्ये बालगोपाळांसह नागरिकांची रंग, पिचकारी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्याने सर्व प्रकारच्या रंगांच्या दरात सुमारे दहा टक्के वाढ झाली आहे. बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, स्प्रे, लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत. मिनी थंडर व थंडर अशा दोन प्रकारच्या स्प्रेला ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी आहे. त्याचबरोबर बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या पिचकाऱ्यांना लहान मुलांची अधिक पसंती मिळत आहे.
-----------------------------------------------------------
पिचकाऱ्यांची चलती
गेल्या वर्षीपेक्षा यंदा नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहेत. बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या उपलब्ध असून यामध्ये विविध कार्टून्सच्या पिचकाऱ्यांची क्रेझ अधिक आहे. त्यात पब्जी या खेळाची पिचकारी, विविध आवाज येणाऱ्या पिचकारीसोबत कार्टूनला अधिक मागणी आहे. साधारण २५० पासून ५०० रुपयांपर्यंत बाजारात पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. हॉकी स्टिक, बंदूक वा वॉटरगनच्या आकारांसह कार्टूनची पिचकारी खरेदीकडे मुलांनी मोर्चा वळवला आहे. विशेष म्हणजे मोटू-पतलू, डोरेमॉन, छोटा भीम, हनुमान आणि सुपरमॅन अशी प्रिंट असलेल्या पिचकाऱ्यांना त्यांची अधिक पसंती आहे.
-------------------------------------------------------
नैसर्गिक रंगाला पसंती
सध्या बाजारात होळीनिमित्त ग्राहक नैसर्गिक रंगाला जास्त पसंती देत आहेत. तसेच लहान मुले कार्टून पिचकारीला पसंती देत असून रंगाचे पोते १०० रुपयांपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत मिळत आहे. टॉपगन, वॉटर टँक व पिचकारी ५० ते १०० रुपयांपासून ते ५०० रुपये अशा किमतीमध्ये उपलब्ध आहे.
----------------------------------------------------
‘भैय्या रंग’ही बाजारात
हॅपी होली लिहिलेली वैविध्यपूर्ण पिवळ्या रंगाची टोपी, तसेच तोंडावर, डोळ्यांना अपायकारक नसणारा छुमंतर हा कलरदेखील आकर्षण ठरत आहे. पिचकारीमध्ये टाकण्यासाठी परफ्युम लिक्विड रंगही उपलब्ध आहेत. केमिकल रंग म्हणून ओळखला जाणारा ‘भैय्या रंग’ हा दोन-तीन दिवस शरीरावर तसाच राहतो. त्यामुळे भैय्या रंगाला मागणी कमी आहे. साधारणत: १०० ते १५० रुपयांपर्यंत त्याचा दर आहे.
-------------------------
महागाईची झळ...
लहान पिचकाऱ्यांची किंमत ५० पासून २५० रुपयांपर्यंत
कार्टून्सच्या पिचकाऱ्या ४०० ते १,२०० रुपयांपर्यंत उपलब्ध
मोठ्या आकाराच्या पिचकाऱ्या एक ते दीड हजार रुपयांना
--------------------------------------------------------
कोट
त्वचेला इजा पोहोचू नये आणि निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून पर्यावरणपूरक रंग विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यांना ग्राहकांकडूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पिचकारी खरेदीसाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- अखिलेश सिंग, विक्रेता
-----------------------------------------------
गेल्या वर्षी मनसोक्‍तपणे होळी खेळता आली नव्हती. या वर्षी मी खूप उत्साही आहे. माझ्या सोसायटीमधील मित्रांबरोबर होळी खेळण्यासाठी माझ्या आवडीची वॉटर टँक पिचकारी खरेदी केली आहे.
- रुद्र संते, डोंबिवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com