महापालिका अधिकाऱ्‍यांसाठी ई वाहने

महापालिका अधिकाऱ्‍यांसाठी ई वाहने

भाईंदर, ता. २ (बातमीदार) : महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी ई-बस घेण्याच्या निर्णयानंतर आता महापालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्‍यांसाठी ई-वाहनेच घेण्याचा निर्णय मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ही ई- वाहने भाड्याने घेण्यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनासाठी परिवहन सेवेतील किमान पंचवीस टक्के बस इलेक्ट्रिक असाव्यात, अशी सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने ४५ ई-बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या बस महापालिका स्वत: घेणार नसून परिवहन सेवा चालविणारा कंत्राटदार त्या खरेदी करणार आहे. त्या कंत्राटदाराला महापालिका बस खरेदीसाठी अनुदान देणार आहे. हे अनुदान महापालिकेला पर्यावरण संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीतून देणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून आता या बस येत्या दोन ते तीन महिन्यांत परिवहनच्या ताफ्यात सामील होण्याची शक्यता आहे. मात्र महापालिका प्रशासन एवढ्यावर थांबलेले नाही तर पर्यावरण संवर्धनासाठी आणखी एक पाऊल टाकत सध्या महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी यांच्यासाठी भाड्याने घेतलेली चारचाकी वाहने देखील ई-वाहनेच असावित, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
सध्या महापालिकेने कंत्राटदाराच्या माध्यमातून साठ वाहने भाड्याने घेतली आहेत. यातील तीस वाहने अधिकारी व पदाधिकाऱ्‍यांसाठी आहेत. महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी यांना विकासकामांवरील देखरेख तसेच सरकारकडून आयोजित केल्या जाणाऱ्‍या बैठका यांना उपस्थित राहण्यासाठी ही वाहने देण्यात आली आहेत. सध्या नगरसेवकांची मुदत संपुष्टात आली असल्यामुळे महापालिकेत पदाधिकारी नाहीत. मात्र अधिकाऱ्‍यांसाठी भाड्याने वाहने घेण्यात आली आहेत. भाडोत्री वाहनांचे वार्षिक कंत्राट नुकतेच संपुष्टात आले आहे. त्यामुळे त्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र नवीन निविदा काढताना साठपैकी अधिकारी व पदाधिकाऱ्‍यांसाठी असलेली तीस वाहने ई-वाहने असावीत अशी अट निविदेत नमूद करण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला आयुक्त दिलीप ढोले यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली.

पाच कोटी रुपयांची तरतूद
वाहने भाड्याने घेण्यासाठी महापालिकेने वार्षिक पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीमधूनच ई-वाहनांसाठी द्यायच्या भाड्याची रक्कम दिली जाणार आहे. ही ई-वाहने भाड्याने घेण्यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. वाहनांद्वारे होणारे प्रदूषण कमी होण्यास हातभार लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com