आम्ही जगायचे तरी कसे?

आम्ही जगायचे तरी कसे?

कासा, ता. ४ (बातमीदार) : सर्वसामान्य गृहिणींच्या, नागरिकांच्या दररोजच्या वापरासाठी लागणाऱ्या गॅसच्या दरात दररोज वाढ होत आहे; तर काही दिवसांपूर्वी डिझेल, पेट्रोलचे भाव वाढले आहेत; तर गरिबांचे इंधन म्हणून वापरले जाणारे रॉकेल दिसेनासे झाले आहे. या इंधन दरवाढ आणि सतत होणाऱ्या गॅसच्या दरवाढीमुळे ‘आम्ही जगायचे तरी कसे’ असा सवाल दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींमधून विचारला जात आहे.
सध्या महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य गृहिणींना त्याचे महिन्याचे घराचे बजेट सांभाळणे कठीण झाले आहे. अशात दुर्गम भागात रोजगाराचे पर्याय उपलब्ध नसल्याने आदिवासी बांधवांना आपले घर चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशात नुकतेच गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या घरगुती गॅस सिलिंडरसाठी ११०० रुपयांना मिळत आहे; तर इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वच वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डहाणू भागातील अनेक उद्योग व्यवसाय बंद झाल्याने पैशांची आवक नाही. त्यामुळे या वाढत्या महागाईचा सामना करत आम्ही जगावे कसे, असा सवाल गरीब आदिवासींना पडला आहे.
...
पुन्हा चुली पेटल्या
पूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांना उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस मिळाले होते, पण गॅसच्या किमती वाढल्याने ८० टक्के गरीब कुटुंबे गॅस वापरत नाहीत. त्यामुळे पुन्हा ही कुटुंबे जंगलातील लाकूडफाटा गोळा करून पूर्वीप्रमोण चुलीचा वापर करू लागली आहेत. पूर्वी रॉकेल सगळीकडे मिळत होते, त्यामुळे स्टोव्ह वापरला जाई, पण आता रॉकेलचेही भाव वाढले आहेत.
....
दर नियंत्रणात आणण्याची मागणी
मोलमजुरी करणाऱ्यांना दररोज ३०० ते ४०० रुपये मजुरी मिळते. पण गोडेतेल, मसाले, डाळी आदी जीवनावश्यक वस्तू यामध्ये या सर्वांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात एखादे आजारपण मागे लागल्यास खूप मोठा खर्च होतो. तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढला आहे. तसेच घरातून बाहेर पडण्यासाठी रिक्षा, प्रवास भाडे खूप महाग झाले आहे. यामुळे शासनाने महागाई कमी करावी, अशी मागणी केली जाते.
...
रिक्षा चालवून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, पण इंधनाचे भाव वाढल्याने आणि पूर्वीसारखे प्रवासी भाडे मिळत नाही, त्यामुळे दररोजचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. पूर्ण खर्च काढून दररोज तीनशे ते चारशे रुपये वाचत होते, पण आता महागाईमुळे त्याच्या निम्मेही पैसे वाचत नाहीत.
- नारायण जाधव, प्रवासी रिक्षा चालक, कासा
....
पूर्वी गॅस सिलिंडर तीन ते चार महिने पुरवून वापरत होते. त्यात गॅसचे भाव वाढल्याने पुन्हा जंगलातील लाकूड आणून घर चालवत आहोत. कामाला जाऊन मिळणाऱ्या मजुरीत घर चालवणे खूप कठीण झाले आहे.
- रुख्मिणी गवळी, गृहिणी, सायवन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com