आरटीई प्रवेशाची गाडी सुसाट

आरटीई प्रवेशाची गाडी सुसाट

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : दुर्बल घटकांतील बालकांना मोफत उच्च प्रतीचे व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासनातर्फे आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळा प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असते. ठाणे जिल्ह्यातील अनुदानित व खासगी अनुदानित शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार मागील ७ वर्षांत आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील ४१ हजार २४० बालकांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असते. ठाणे जिल्ह्यातील ६५८ अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका आणि पाच तालुक्यांतील शाळांनी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून पटसंख्येची माहिती भरण्यात आली होती. तसेच पालकांनीदेखील ऑनलाईन पद्धतीने आपल्या पाल्यांचे अर्ज दाखल करण्यात येत असत. सन २०१६-१७ पासून ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीच्या काळात या प्रवेश प्रक्रियेची नागरिकांमध्ये जनजागृती व अर्ज करण्याची व त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती नसल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कालांतराने आरटीई प्रवेश प्रक्रियेची व्यापक प्रमाणात करण्यात आलेली जनजागृतीमुळे दिवसेंदिवस या प्रक्रियेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठाणे जिल्ह्यात मागील सात वर्षांत ४१ हजार २४० बालकांना उच्च प्रतीच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळाला आहे. त्यात मागील वर्षी सर्वाधिक ८ हजार ४५१ बालकांना प्रवेश देण्यात आला.

........................................................
प्रवेशावर दृष्टिक्षेप
वर्ष आरटीई शाळा प्रवेश निश्चित

२०१७ ५६० २५५३
२०१८ ६१३ ४३१६
२०१९ ६४० ५६४२
२०२० ६५२ ५८३०
२०२१ ६६९ ६९६७
२०२२ ६७७ ७४८१
२०२३ ६५८ ८४५१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com