पर्यावरणपूरक रंगांची उधळण

पर्यावरणपूरक रंगांची उधळण

वैभवी शिंदे, नेरूळ
भारतात होळी या सणाला खूप महत्त्व आहे. देशात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यात होळीपाठोपाठ येणाऱ्या रंगाचा सण म्हणून धूलिवंदनलादेखील आगळेवेगळे महत्त्व आहे. या दिवशी विविध रंगाची उधळून करून रंगपंचमी साजरी केली जाते; पण हा सण साजरा करताना या रंगाचे महत्त्व कधी जाणून घेतले नाही. त्यामुळे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या रंगांना सणानिमित्त असलेल्या महत्त्वाबरोबरच रासायनिक रंगांचा वापराने होणाऱ्या दुष्परिणामांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
--------------------------------------
नैसर्गिक रंगांविषयी वारंवार जनजागृती होऊनही अजूनही बाजारात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक रंग उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे लोकांनी हे रंग घरी बनवून रंगपंचमी साजरी करावी. जेणेकरून रासायनिक रंगामुळे शरीराला इजा होणार नाही. म्हणून नैसर्गिक रंगांचा वापर करावा. जेणेकरून ऋतू बदलांमुळे शरीराच्या तापमानात होणार बदल आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम, तसेच उष्णतेचा दाहदेखील कमी होणार आहे. नैसर्गिक रंग सहज निघून जातात, त्यामुळे लहान मुलांच्या शरीरावर त्याचा कोणता परिणाम होणार नाही. तसेच नैसर्गिक रंग डोळ्यात, तोंडात, कानात, केसात गेले तरी त्याचा कोणताही परिणाम होत नाही.
-----------------------------------
लाल - लाल रंग रक्तचंदन तसेच कुंकू वापरून करता येईल. रक्तचंदन हे शरीराचा दाह कमी करण्यासाठी वापरले जाते. रक्तचंदन उगाळून त्यामध्ये थोडे पाणी घालून ओला रंग किंवा रक्तचंदनाच्या पावडरमध्ये गव्हाचे पीठ घालून त्याचा रंग म्हणून वापर करता येईल. जास्वंदाची फुले सुकवूनही लाल रंग तयार करता येतो.
-------------------------------
पिवळा - हळद, बेसन या दोन्हीचे मिश्रण करून पिवळा रंग मिळवता येऊ शकतो. तसेच झेंडूची फुले सहा-सात तास गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यानंतर पाण्याला पिवळा रंग येईल.
----------------------------------
हिरवा - पालक, कोथिंबीर, कडुलिंबाची पाने यापासून हिरवा रंग तयार होतो. कोवळी पालेभाजी निवडल्यानंतर तसेच कोरड्या हिरव्या रंगासाठी मेंदी पावडर गव्हाच्या पिठामध्ये मिसळल्यानंतर हिरवा रंग तयार होईल.
------------------------------------
गुलाबी - बीट किसल्यानंतर हातावर दीर्घ काळ गुलाबी रंग टिकून राहतो. त्यामुळे अर्थातच हा गुलाबी रंग तयार करण्यासाठी बिटाचा वापर करता येईल. कोरड्या रंगासाठी बीट पाण्यात मिसळायचे किंवा गव्हाच्या पीठामध्ये किंवा मैद्यामध्ये गुलाबी रस मिसळून रंग तयार होईल.
---------------------------------------
केशरी - केशरी झेंडूच्या किंवा पांगिऱ्याच्या फुलापासून केशरी रंग तयार करता येऊ शकतो. ओला केशरी रंग तयार करण्यासाठी ही फुले रात्रभर पाण्यात भिजवून ही फुले सावलीमध्ये सुकवल्यानंतर त्याची पावडर करून केशरी रंग तयार करता येऊ शकतो.
----------------------------------
काळा - आवळ्याची पावडर रात्रभर लोखंडी भांड्यात भिजत घालावी, दुसऱ्या दिवशी यात पाणी घालावे. आवळ्याचा किस लोखंडी तव्यावर घालून त्यात पाणी घालून उकळले की काळा रंग तयार होतो.
-------------------------------------
निळा - निळ्या जास्वंदापासून किंवा नील मोहोरापासून निळा रंग निर्माण करता येतो. ही फुले पाण्यात बुडवून ओला निळा रंग मिळेल. ही फुले सुकवून त्याची पावडर करूनही निळा रंग तयार करता येऊ शकतो.
--------------------------------------
रासायनिक रंगांचे तोटे
रासायनिक रंग वापरल्यामुळे कॅन्सर व शरीरावरील त्वचेला अनेक आजार होण्याची शक्यता असते. कान, नाक तसेच तोंडात हे रंग गेल्यामुळे लहान मुलांना त्रास होऊ शकतो. रासायनिक रंग अनेक दिवस शरीरावर राहतात, यामुळे अंगाला खाज येण्याचे प्रकार होतात. हे रंग पाण्यात मिसळल्यावर अधिक गडद होतात. अशा रासायनिक रंगांचा वापर केल्यामुळे केस केवळ पांढरे होत नाहीत, तर दुभंगणे, तुटणे किंवा गळणे यांसारखे विकारही होऊ शकतात.
--------------------------------------
होळीला रंग खेळण्यापूर्वी केस, अंग स्वच्छ धुऊन, सुकवून घ्या. केसांसोबत हातांच्या बोटांमध्ये कानाच्या मागे तेल लावावे. कारण रासायनिक रंग त्वचेला हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक रंगांचाच वापर करा.
- डॉ. मोणाली वाघचौरे, (एमडी) आयुर्वेदिक फिजिशियन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com