टॅक्सी चालकांना लुटणारी टोळी जेरबंद

टॅक्सी चालकांना लुटणारी टोळी जेरबंद

मानखुर्द, ता. ४ (बातमीदार) ः गोवंडी, चेंबूर परिसरामध्ये लागोपाठ लुटीचे तीन गुन्हे करणाऱ्या टोळीला शिवाजी नगर पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली. उबेद इद्रिसी, अब्दुल खान व जुनेद खान अशी त्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. यातील उबेद सराईत गुन्हेगार असून इतर दोघांचा अभिलेख तपासण्यात येत आहे. या तिघांनी शिवाजी नगर, देवनार तसेच चेंबूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलग तीन लुटीचे गुन्हे केले. त्या गुन्ह्यांची उकल करत सहायक निरीक्षक नवनाथ काळे यांच्या पथकाने लुटलेले साहित्य जप्त केले आहे.
उबेद, अब्दुल व जुनेद हे गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात राहणारे टोळके प्रवासी टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या ॲपवरून टॅक्सी बुक करत. त्यानंतर त्या टॅक्सीचालकाला आडबाजूला नेऊन लुटून पळ काढत होते. बुधवारी (ता. १) पहाटे त्यांनी अशाच रीतीने टॅक्सी बुक केली. दिलेल्या पत्त्यावर टॅक्सीचालक सोहेल सईद टॅक्सी घेऊन पोहोचले. त्यांना या तिघांनी टॅक्सीसह शिवाजीनगर पोस्ट ऑफिस रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या मागे नेले. त्या ठिकाणी नेल्यावर त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून पळ काढला.
त्यानंतर सोहेल यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठत त्या तिघांविरोधात तक्रार नोंदवली. १२ तासांमध्ये घडलेल्या सलग तीन चोरीचे गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक निरीक्षक नवनाथ काळे यांच्या पथकाने त्वरित तपासाला सुरुवात केली. टॅक्सी बुक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे तांत्रिक तपास तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पथकाने तपासले. त्या आधारे आरोपींची ओळख पटवत त्यांना तात्काळ अटक केली. त्यापैकी उबेदविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्यासह तीन विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात समोर आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com