निसर्ग सौंदर्यात वसलेले गणेश मंदिर

निसर्ग सौंदर्यात वसलेले गणेश मंदिर

अभय आपटे, रेवदंडा
अलिबाग तालुक्यातील समुद्र किनारपट्टीत येणार्‍या गावांना अष्टागर असे म्हटले जाते. धार्मिक प्रवृत्ती असल्याशिवाय मानवी जीवनास लागणारे आत्मिक समाधान लाभत नाही. यासाठी पुरातन काळापासून अष्टागरात मंदिरे बांधण्यात आली. त्यातीलच एक म्हणजे चौलमधील स्वयंभू श्री मुख्य (मुखरी गणेश मंदिर) आहे.

अष्टागारातील चौल, रेवदंडा या जोड गावात पांडवांनी एका रात्रीत सूर्यास्तापासून सूर्योदयाच्या आत ३६० मंदिरे आणि त्यांच्यासमोर तितक्याच पुष्करणी बांधल्याची आख्यायिका आहे. त्यातील काही मंदिरे नष्ट झाली आहेत. तर काही अजून चांगल्या स्थितीत आहेत. यादव काळ अगर तत्पूर्वी अष्टगरवासीयांची जी धार्मिक भावना होती तीच आंग्रे काळातील इतिहासावरून दिसून येते. अशा या चौलमधील स्वयंभू श्री मुख्य (मुखरी) गणेश मंदिर निसर्ग सौंदर्यामुळे भाविकांच्या पसंतीस उतरलेले आहे.
रेवदंडा-अलिबाग हमरस्त्यावरील चौल चंपावती नगरीच्या प्रवेशद्वारा जवळ हे स्वयंभू असल्याने याची वेगळी ओळख आहे. या मंदिराबाबतचा सुमारे ३२० वर्षांचा इतिहास आहे. मंदिराचा पहिला जिर्णोद्धार आंग्रे कुटुंबातील लक्ष्मीबाई आंग्रे यांच्या हस्ते झाल्याचा उल्लेख आहे. या गणपतीला ''मुख्य गणपती'' असे नाव प्रचलित आहे. परंतु इतिहासकालीन अप्पर चौल (आजचे चौल) मुसलमानी अमलाखाली असताना या शब्दाचे मुखरी असे अपभ्रंशात्मक रूप होऊन रूढ झाले आहे. वरील वर्षाचा इतिहास ज्ञात असला, तरी गणपतीचे प्रकटीकरण केव्हा झाले, याची माहिती अद्याप उपलब्ध नाही.
मंदिराचा परिसर निसर्गरम्य असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी असतेच. शिवाय, चौलमधील नागरिक संकष्टी, अंगारकी, गणेश जयंतीच्या उत्सवाला न चुकता मंदिरात येतात. मंदिर रस्त्यावर असल्याने पर्यटकही मोठ्या संख्येने भेट देतात. जन्मोत्सवाचा कार्यक्रम भव्य प्रमाणात होतो.

असे पडले मुखरी नाव
मुखरी नावाचा कोळ्याचा मुलगा संकटात सापडला होता. तो सुखरूप घरी परतला, तर छोटसे मंदिर बांधेन, असा नवस केला होता. त्यावरून मुखरीचा गणपती असे नाव पडले.

आख्यायिका
मंदिराबाबत एक कथा सांगितली जाते. या गणपतीला एक हस्तीदंती दात आला. तो काही समाजकंटकांनी तोडून काढला. त्या वेळी गणपतीच्या नयनातून अश्रूधारा वाहू लागल्या, अशी कथा सांगितली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com