पालघर जिल्ह्यात धुळवड उत्साहात

पालघर जिल्ह्यात धुळवड उत्साहात

वसई, ता. ७ (बातमीदार) : होळी हा सण म्हणजे अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम. पालापाचोळ्याचा नायनाट करून स्वच्छता करण्‍यासाठी होळी सण साजरा केला जातो. ग्रामीण भागात प्रत्येक गाव-पाड्यात सोमवारी रात्री हा उत्‍सव जल्लोषात साजरा करून पूजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणेच पालघर जिल्ह्यात यंदा धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पारंपरिक पद्धतीने होळीचे पूजनही विधिवत करण्यात आले; तर पर्यावरणाचा जागर करत रंगपंचमीला पाण्याचा वापरही कमी प्रमाणात झाल्‍याचे दिसून आले. जिल्‍ह्यात ठिकठिकाणी बच्‍चे कंपनीचा जल्‍लोष मोठ्या प्रमाणात होता. त्‍याचबरोबर नैसर्गिक रंगाने होळीचा मनसोक्‍तपणे आनंद लुटतानादेखील रासायनिक रंगांना नागरिकांकडून बगल देण्‍यात आली.

पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेल्या कोळीवाड्यात गेल्‍या अनेक दशकांपासून सुरू असलेला होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी तरुणाईच्‍या आनंदाला उधाण आले होते. होळीच्या दिवशी नवविवाहित मानाचे जोडेही उपस्थित होते. त्यांनी विधिवत होळीभोवती प्रदक्षिणा घातली व होळी मातेकडे पुढील वैवाहिक आयुष्य सुखा-समाधानात जावे म्हणून साकडे घातले. या वेळी खोलवर समुद्रात गेलेला मच्छीमार बांधवदेखील कोळीवाड्यात हजर होत होळीचा आनंद घेत असल्याचे दिसून आले. कोळी बांधवांनी नटून-थटून कोळी बँडच्या तालावर पारंपरिक नृत्य केले. जिल्ह्यातील गावागावांत पारंपरिक पद्धतीने मनोरा रचून होळीची विधिवत पूजा करण्यात आली.
केळवे, डहाणू, कळंब, राजोडी, अर्नाळा, वसई सुरुची बाग समुद्रकिनारी तसेच तुंगारेश्वर चिंचोटी येथे होळी सणानिमित्त पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळाली. या वेळी पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्षता घेण्यात आली होती.
-----------------------------------
नृत्‍याचा मनमुराद आनंद
गृहसंकुलांत राहणाऱ्या नागरिकांनी एकत्र येत रंगपंचमीचा आनंद लुटला. या वेळी त्‍यांनी होळी गीतावर मनमुराद नृत्य केले. मित्र मंडळी व ग्रामस्थांनी गावागावांत होळीनिमित्त रंगांची उधळण केली. काही ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
---------------------------
दोन दिवस नाकाबंदी
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय व पालघर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यलयाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी दोन दिवस नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी वाहनांची तपासणी केली.
-----------------------------------------------------
नैसर्गिक रंगांची उधळण
वाडा, ता. ७ (बातमीदार) : उत्साहाने वाटती आनंद सारे, पिचकारीने उडवूनी रंगांचे फवारे, उधळू या रंग आज स्वच्छंदी गगनात, सुख-समृद्धी नांदो प्रत्येकाच्या जीवनात... असा हा धुळवड सण या वर्षी तरुणाईने रासायनिक रंगांना नापसंती दर्शवत नैसर्गिक रंगांनी साजरा केला. मंगळवारी मोहोट्याचा पाडा येथील तरुणांनी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करून संस्कृतीचे जतन व रक्षण करताना दिसून आले. होळी सणाच्‍या निमित्ताने अनेक गावांत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले; तर अनेक गावांमध्ये मैदानी कबड्डी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. गाव-पाड्यांतील महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करत होळीची पूजा करून पोळी व नारळ अर्पण करीत असतात. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कठीण काळानंतर पहिल्यांदाच कोणत्याही निर्बंधांशिवाय होळीचा सण सर्वत्र साजरा झाला. ग्रामीण भागांमध्येही आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com