प्लास्टिकबंदी विरोधात पालिकेनी कसली कंबर

प्लास्टिकबंदी विरोधात पालिकेनी कसली कंबर

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : राज्य शासनाने पर्यावरणास घातक असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर यापूर्वीच बंदी घातली आहे. त्यात ठाणे शहरात प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली असून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ही कारवाई करीत असताना पालिका प्रशासन, दुकानदार आणि फेरीवाल्यांमध्ये अनेकदा खटके उडत असतात. असे असतानादेखील ठाणे पालिकेने १ एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत चार हजार ७९४ आस्थापनांवर कारवाई करत २.६७ टन प्लास्टीक जप्त केले असून चार लाख ४५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
शहर स्वच्छतेचा ध्यास घेतलेल्या ठाणे महानगरपालिका प्रशासनाने आता प्लास्टिकमुक्त ठाणे शहरासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यात ठाणे महापालिका प्रशासनाकडून शहरातील विविध दुकानांसह हातगाड्यांची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यानुसार १ जुलैपासून संपूर्ण देशात सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी असून वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचनेनुसार प्लास्टिक वापरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांकरिता दंडाची रक्कम रुपये ५०० आकारण्यात येणार आहे; तर दुकानदार, फळे व भाजी विक्रेते, व्यापाऱ्यांकरिता प्रथम गुन्हा केल्यास ५ हजार, दुसरा गुन्हा केल्यास १० हजार; तर तिसरा गुन्हा केल्यास २५ हजार व ३ महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने प्लास्टिकबंदीसाठी स्वच्छता निरीक्षकांसह उपमुख्य स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यांच्यावर प्लास्टिकमुक्त मोहिमेची जबाबदारी देण्यात आली आहे.

....................................
पथकावरील हल्ल्याच्या घटनांत वाढ
दिवसेंदिवस ठाण्यात फेरीवाल्यांची मुजोरी विकोपाला गेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच आता दुकानदारांकडूनही पालिका कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. प्लास्टिकविरोधी कारवाई करत असताना दुकानदाराने पथकावर हल्ला केला असून यामध्ये उपमुख्य स्वच्छता निरीक्षक हेमंत चौधरी यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. असे असले, तरी पालिका प्रशासनाकडून प्लास्टिकविरोधी कारवाई अधिक तीव्र केली असल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com