
वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सत्कार
जागतिक महिला दिनी शंभर स्त्रियांचा गौरव
मुंबई, ता. ९ : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा, ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे व प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रांत आपला ठसा आणि महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १०० महिलांचा नवी मुंबईत सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांची उपस्थिती होती. यानिमित्ताने ‘संवाद नात्यांचा... कविता डॉट कॉम’चा इथे प्रयोग सादर झाला. याअंतर्गत महिला कवयित्री आणि कवींनी महिलांच्या कर्तृत्वावर कविता सादर केल्या. नवी मुंबईच्या अतिरिक्त आयुक्त ढोले यांच्या हस्ते काही महिलांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सहायक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, साहित्य मंदिर सभागृह सदस्य अजय देवकर, तसेच साहित्य सभागृह मंदिराच्या प्रा.आश्विनी बाचलकर यांनी केले होते.
नेतृत्ववान, कर्तृत्ववान अशा महिलांचा गौरव होणे म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळणे. लतादीदींच्या स्मरणार्थ ९३ गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम या संस्थेच्या वतीने राबवण्यात आला होता. महिलांसाठी राबवलेल्या या कार्यक्रमात प्रत्येक क्षेत्रातील महिलांचा सत्कार केला गेला. महिलांच्या गुणांना वाव देण्याची ही महत्त्वपूर्ण संधी आहे.
- सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका