विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मृत्यूचा बनाव...३ आरोपी अटकेत

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मृत्यूचा बनाव...३ आरोपी अटकेत

दोन कोटीच्या विम्यासाठी
मृत्यूचा बनाव
तीन आरोपी अटकेत
मुंबई, ता. ९ : अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचून विम्याचे दोन कोटी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना शिवाजी पार्क पोलिसांनी नुकतीच अटक केली. दिनेश टाकसाळे, त्याचा मित्र अनिल लटके व विजय माळवदे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीने विमा कंपन्यांकडे सादर केलेल्या बनावट कागदपत्रांत अधिक उत्पन्न दाखवले होते. त्या बदल्यात दोन विमा योजना घेतल्या होत्या. त्या प्रकरणी एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार केली होती.
एलआयसीच्या दादर शाखेतील अधिकारी ओमप्रकाश साहू यांच्या तक्रारीवरून मंगळवारी पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक, कट रचणे, फसवणुकीचा प्रयत्न आदी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिस पथकाने तपास करून टाकसाळे, लटके आणि माळवदे यांना अटक केली.
आरोपींनी अभियांत्रिकी क्षेत्रात पदविकेचे शिक्षण घेतले असून ते नगरमधील रहिवासी आहेत. टाकसाळेने २१ एप्रिल २०१५ रोजी एलआयसीकडे दोन कोटी रुपयांच्या विम्यासाठी अर्ज केला होता. त्याशिवाय त्याने साडेपाच कोटी रुपयांचा आणखी एक विमा काढला होता. त्यासाठी सादर केलेल्या बनावट कागदपत्रांमध्ये शेती व खानावळ यांच्या माध्यमातून वर्षाकाठी ३४ ते ४० लाख रुपये उत्पन्न आणि स्वतःची मिळकत दाखवली होती. त्यानंतर २५ डिसेंबर २०१६ रोजी पुणे-नगर रस्त्यावरील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका तरुणाचा मृतदेह दिनेशचा असल्याचा दावा केला होता. त्यासाठी पोलिसांकडे आरोपीचे तोतया आई-वडील उभे करण्यात आले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून गाडीचे चाक गेल्यामुळे त्याची ओळख पटवणे शक्य नव्हते. त्याच्याच आधारे आरोपींनी तो दिनेशचाच मृतदेह असल्याचे सिद्ध केले. त्यानंतर त्याच माहितीच्या आधारे तोतया आई-वडिलांच्या माध्यमातून दोन्ही विम्यांचे एकूण आठ कोटी रुपये मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, फक्त दोन कोटी रुपयांचा अर्ज स्वीकारण्यात आला.

असा झाला गुन्हा उघड
दिनेश टाकसाळेच्या खऱ्या आईने आपला मुलगा जिवंत असल्याचे सांगितले. दिनेशच्या वडिलांचा यापूर्वीच मृत्यू झाल्यामुळे दावा करण्यासाठी आलेले आई-वडील कोण, असा संशय विमा कंपनीला आला. त्याबाबत एलआयसीने केलेल्या तपासणीत दिनेश जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एलआयसीने याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com