नववर्ष स्वागतयात्रेसाठी ठाणे महापालिका सज्ज

नववर्ष स्वागतयात्रेसाठी ठाणे महापालिका सज्ज

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेत ठाणे महापालिकेचाही सहभाग असतो. त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी तयारीचा प्राथमिक आढावा घेतला. या यात्रेच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केल्या आहेत.
बुधवार, २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजता भारतीय नववर्ष स्वागतयात्रा कौपीनेश्वर मंदिरातून निघणार आहे. ही स्वागत यात्रा जांभळी नाका, चिंतामणी चौक, दगडी शाळा, गजानन महाराज मंदिर, हरिनिवास सर्कल, गोखले रोड, राम मारुती रोड, मासुंदा तलाव आणि कौपीनेश्वर मंदिर या मार्गाने जाणार आहे. ठाणे महापालिकेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, शिक्षण विभाग, उद्यान विभाग, परिवहन विभाग, पाणीपुरवठा विभाग, ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड आणि प्रदूषण नियंत्रण विभाग यांचे चित्ररथ स्वागतयात्रेत सहभागी होणार आहेत. आढावा बैठकीस नगर अभियंता प्रकाश सोनाग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, प्रशांत रोडे, अनघा कदम, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरीश झळके, स्वागतयात्रेच्या आयोजन समितीचे सदस्य संजीव ब्रह्मे, कुमार जयवंत, भरत अनिखिंडी, प्रसाद दाते आदी उपस्थित होते.

--------------------------
अग्निशमन दल, पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश
स्वागत यात्रेसाठी मासुंदा तलाव परिसर, स्वागतयात्रेचा मार्ग स्वच्छ ठेवण्याच्या सूचना संदीप माळवी यांनी आढावा बैठकीत दिल्या. या मार्गावरील अतिक्रमणे, फेरीवाले हटवण्यास अतिक्रमण विभागास सांगण्यात आले. मासुंदा तलाव परिसर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आदी भागांत रोषणाईच्या सूचना विद्युत विभागास देण्यात आल्या आहेत; तर स्वागतयात्रेदरम्यान सर्व सुविधांसह वाहने तैनात करण्यास अग्निशमन विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. उन्हाळा लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्याबाबत पाणीपुरवठा विभागाने विशेष काळजी घ्यावी, असे माळवी यांनी स्पष्ट केले.

------------------------

१९ मार्चपासून सांस्कृतिक मेजवानी
स्वागत यात्रेच्या निमित्ताने १९ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळत ठाण्यातील विविध नृत्यसंस्थांच्या विद्यार्थिनी व त्यांच्या नृत्यगुरू यांचा नृत्यधारा हा कार्यक्रम होणार आहे. २० मार्च रोजी गंधार भालेराव यांचे बासरीवादन, पं. मुकुंदराज देव यांच्या शिष्य परिवाराचे तबलावादन आणि पं. शैलेश भागवत यांचे सनईवादन; तर २१ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता गीता पठण, रुद्र व शिवमहिन्म स्त्रोत पठण होणार आहे. रात्री ८.३० ते १० या वेळेत इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार आहे. सर्व कार्यक्रम कौपीनेश्वर मंदिराच्या प्रांगणात पार पडणार असून २१ मार्च रोजी पूर्वसंध्येला मासुंदा तलाव परिसरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com