मासळ्यांचे प्रमाणात घट

मासळ्यांचे प्रमाणात घट

तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : समुद्रात वाढत असलेले प्रदूषण, भूगर्भ सर्वेक्षणादरम्यान केले जाणारे स्फोट, सागरी जलवाहतूक; तसेच खाडीपुलाचे काम याशिवाय बेकायदा मार्गाने होणारी मासेमारी अशा विविध कारणांमुळे समुद्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे. त्यामुळे माशांची आवक कमी होऊ लागली आहे. याचा परिणाम पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर होत आहे. उन्हाळ्यात मासळीची आवक वाढली जाते. ही आवक आता घटल्याने मासळीचे दर वाढले असून खवय्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
नवी मुंबईतील दिवाळे गाव संपूर्णतः मासेमारीवर उपजीविका करतो. त्यानंतर करावे, सारसोले, वाशी गाव, कोपरखैरणे, घणसोली, दिवा गाव व ऐरोली यांसह मोठ्या संख्येने मच्छीमार बोटी घेऊन मासेमारीसाठी समुद्रात जातात. काही वर्षांपासून एकापाठोपाठ एक अशी संकटे उभी राहत असल्याने त्यांचा पारंपरिक व्यवसाय डबघाईला येऊ लागला आहे. समुद्रातील प्रदूषण वाढीस लागत आहे. दुसरीकडे तेलसाठे शोधण्यासाठी समुद्रात काही वर्षांपासून भूगर्भ सर्वेक्षण सुरूच आहे. यामुळे अधूनमधून पाण्यात स्फोट घडवून आणले जात आहेत. याचा परिणाम समुद्रातील मत्स्यजीवांवर होऊ लागला आहे. एलईडी व पर्सेसिनद्वारे मासेमारी करण्यास बंदी असतानाही बेकायदा मासेमारी होत आहे. याचा परिणाम पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर होऊ लागला आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात मासे जाळ्यात येत नसल्याचे मच्छीमारांनी सांगितले.


पदरी निराशा
बोटींसाठी हजारो रुपयांचे इंधन लागते. बोट समुद्रात नेल्यावर मात्र मासळी हाताशी लागत नसल्याने पदरी निराशा पडू लागली आहे. माशांच्या प्रजाती नष्ट होत आहेत, तर दुसरीकडे ज्या काही प्रजाती शिल्लक आहेत, त्यांना वाढीसाठी विशिष्ट वेळ दिला जात नसल्याने समुद्रातील मासे कमी होत असल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले. सुरुवातीला एका फेरीला २५ ते ३० टब मिळणाऱ्या मासळीचे प्रमाण आता पाच ते सात टब झाले आहे. कधी कधी तर रिकाम्या हाती परतावे लागते. पापलेट, सुरमई व इतर मासेही तुटपुंज्या स्वरूपात मिळत आहेत, असेही मच्छीमार बांधवांनी सांगितले.

इंधन दरवाढीच्या झळा
वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वच जण मेटाकुटीला आले आहेत. या दरवाढीचा फटका मच्छीमार बांधवांनाही बसू लागला आहे. बोटींना लागणारे डिझेल मच्छीमारांना १२४ रुपये प्रतिलिटरने घ्यावे लागत आहे. तेच इंधन इतरत्र १०२ रुपये लिटर आहे. त्यामुळे मच्छीमारांना बोटीसाठी जवळपास अधिकचे २० ते २२ रुपये मोजावे लागत आहेत. त्याच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

विकासकामांचा फटका
नवी मुंबईत सुरू असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वेळी टेकड्यांचे सपाटीकरण करण्यासाठी सुरुंग लावण्यात येत होते. त्याच्या आवाजाने माशांच्या प्रजाती कमी होत गेल्या. याशिवाय रासायनिक करखान्यातून बाहेर पडणारे रासायनिकयुक्त पाणीदेखील खाडीत सोडले जाते. वाशी खाडी पुलावर दुसऱ्या व तिसऱ्या पुलाची निर्मिती अशा विविध कारणांमुळे मच्छीमार हवालदिल झाले आहेत.

सरकारकडे आम्ही सातत्याने मच्छीमारांचे प्रश्न मांडत असतो; परंतु पारंपरिक मच्छीमारांची उन्नती व शाश्वत विकासाकडे सरकार लक्ष देत नाही. विविध प्रकारच्या कारणांमुळे माशांची आवक घटली आहे. याचा परिणाम मच्छीमारांवर होऊ लागला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मासळीची आवक जास्त प्रमाणात असते; मात्र या वर्षाच्या तुलनेत माशांची आवक घटली आहे. अनेक ठिकाणी जलवाहतूक सुरू झाली आहे, तर काही ठिकाणी समुद्रामार्गे पूल आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत. औद्योगिक वसाहतीमधून रासायनिक सांडपाण्यामुळे माशांचे प्रमाण घटले आहे.
- हेमंत कोळी, मच्छीमार बांधव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com