वाढीववासीयांच्या मरणयातना सुटणार

वाढीववासीयांच्या मरणयातना सुटणार

पालघर, ता. ११ (बातमीदार) : पश्चिम रेल्वेच्या सफाळे-वैतरणा स्थानकारदरम्यानच्या पूर्वेला वैतरणा नदीच्या बेटावर वसलेल्या गाववासीयांच्या मरणयातना सुटणार आहेत. वैतरणा पुलावर पादचारी पूल बनवण्यात येणार असल्याची ग्वाही पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अशोक मिश्र यांनी खासदार राजेंद्र गावित यांना दिली. प्रवासासाठी पूल बांधून देण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना मिश्र बोलत होते. खासदार गावित यांनी रेल्वे प्रश्नांवर महाप्रबंधक यांच्यासह विविध विभागाची बैठक पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भवन येथे आयोजित केली होती. या बैठकीत खासदार गावित यांच्यासह महिला प्रवासी, रेल्वे प्रवासी संघटना प्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाशी संबंधित विविध अधिकारीवर्ग उपस्थित होते.
वसईच्या पाणजू बेटाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला असल्याची माहिती महाप्रबंधक मिश्र यांनी खासदार गावित यांनी रेल्वेप्रश्नांवर आयोजित केलेल्या या बैठकीत दिली. भाईंदर पुलावरून जलवाहिनी पाणजू येथे आणण्यासाठी सुमारे नऊ कोटी मंजूरही झाल्याने येत्या काळात या कामालाही सुरुवात होऊन पाणजूवासीयांचे पाणीसंकट टळणार आहे. डहाणूहून सकाळी ७.०५ वाजताची लोकल पूर्ववत करण्याची खासदारांची मागणी ग्राह्य धरत ती पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. खानदेश एक्स्प्रेसला डहाणू येथे लवकरच थांबा दिला जाईल, त्यासाठी प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत हा थांबा विचारविनिमय करून लवकरच देऊ, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने प्रवासीवर्गासह गावित यांना दिले.

---------------------
विविध स्थानकांना थांबे देण्याची मागणी
वांद्रे-अजमेर-मैसूर या रेल्वेगाडीला पालघर येथे थांबा द्यावा, अशी सूचना खासदार गावित यांनी केली असून दौंड-इंदोर-पुणे, वांद्रे-भावनगर, वांद्रे-भुज- कच्छ, दादर-बिकानेर, वांद्रे-पाटणा, वांद्रे-गझिपूर एक्स्प्रेसना पालघर येथे प्रवासी वर्गाच्या मागणी लक्षात घेऊन थांबे द्यावेत, अशी आग्रही गावित यांनी मागणी रेल्वे महाप्रबंधक मिश्र यांना केली.

--------------------
चौपदरीकरण प्रकल्पातील सुविधा उपलब्ध करू
पश्चिम रेल्वेच्या डहाणू-वैतरणा रेल्वे स्थानकांदारम्यान भौतिक सुविधा, प्रवासी सुरक्षा, सरकते जिने, अतिक्रमण, शीत शवागारगृह, रेल्वे गाडी माहिती सूचना दर्शक इंडिकेटर, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधा प्राप्त करून द्या, अशीही मागणी केली असता विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पात या सुविधा अंतर्भूत असून लवकरच प्रकल्पासह या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील, असे मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गाने या वेळी माहिती दिली.

-------------------
स्थलांतर थांबण्यासाठी प्रयत्न
ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी डहाणू नाशिक रोड रेल्वेचा विचार करणे गरजेचे आहे. सर्वेक्षणासाठी निधीही मंजूर होता. मात्र या लाईनचा विचार रखडत आहे. त्यामुळे या रेल्वेलाईनसाठी रेल्वेने विचार करून तातडीने सर्वेक्षण केल्यास व जोडलाईन अमलात आणल्यास येथील स्थलांतर, कुपोषण असे प्रश्न दूर होतील व रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊन ग्रामीण भागाचा शाश्वत विकास होणार आहे, असे गावित यांनी सांगितले. यानंतर संबंधित अधिकारीवर्गाने या मार्गाचा विचार करून आवश्यक कार्यवाहीसाठी पावले उचलली जातील, असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com