पाच हजार इलेक्ट्रिक बस येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच हजार इलेक्ट्रिक बस येणार
पाच हजार इलेक्ट्रिक बस येणार

पाच हजार इलेक्ट्रिक बस येणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः चालू आर्थिक वर्षात एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे ५ हजार १५० इलेक्ट्रिक बस दाखल करण्यात येणार आहेत. तसेच सध्या सेवा देणाऱ्या डिझेल बसचे रूपांतर सीएनजी, एलएनजीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. या माध्यमातून डिझेलसाठी होणारा अवास्तव खर्च कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

इंधनावर होणारा वाढीव खर्च कमी करण्यासाठी आणि वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्राने इलेक्ट्रिक धोरण आखले आहे. त्या अंतर्गत एस.टी. महामंडळाने विद्युत बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १५० बस खरेदी करण्यात येणार आहेत. मार्च अखेरपर्यंत ७५ बस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. त्यापैकी ५० बस मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांना सेवा देणार आहेत. त्यासाठी द्रुतगती महामार्गावर विद्युत चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत; तर दुसऱ्या टप्प्यात २०२४ मध्ये एसटीच्या ताफ्यात ५००० विद्युत बस विकत घेण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

त्याचबरोबर ५००० डिझेल बसचे सीएनजीमध्ये रूपांतर केले जाणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक यासाठी राज्याला सहकार्य करणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे शिष्टमंडळ सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. एसटी महामंडळातील ५,१५० इलेक्ट्रिकल बसेस त्याचबरोबर ५ हजार डिजेल बसचे सीएनजीमध्ये रूपांतर या प्रकल्पांसाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळ प्रशानाने यानंतर सांगितले.