जोगेश्वरीत शाब्बास वहिनी कार्यक्रम

जोगेश्वरीत शाब्बास वहिनी कार्यक्रम

जोगेश्वरी, ता. १३ (बातमीदार) ः जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांचे मार्गदर्शन व उपस्थितीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पार पडलेल्या ‘शाब्बास वहिनी’ या स्पर्धेत संध्या मोहिते यांनी पुरस्‍कार पटकावला. त्यांना मानाची पैठणी, सोन्याची नथ, ट्रॉफी व श्रीफळ असा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील आठ शाखांमधून निवडलेल्या प्रत्येकी एक महिलांमध्ये ही अंतिम स्पर्धा घेण्यात आली. उर्वरित सात शाखांमधील अंतिम फेरीतील महिला स्पर्धकांचाही या वेळी पुरस्कार व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी विधानसभा संघटक व माजी नगरसेविका साधना माने, जोगेश्वरी विधानसभा संघटक विश्‍वनाथ सावंत, महिला विधानसभा संघटक रचना सावंत, माजी नगरसेवक बाळा नर, रेखा रामवंशी आदी मान्‍यवरांसह रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्करोगग्रस्‍तांना पांघरूणवाटप
धारावी, ता. १३ (बातमीदार) : शिवजयंतीनिमित्ताने जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने परळ येथील टाटा कर्क रुग्णालयात उपचार घेत असलेल्या, परंतु नाइलाजाने पदपथावर राहावे लागत असलेल्या रुग्णांना पांघरूणवाटप करण्यात आले. जनता दलाने सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवला असून जनतेनेही महान व्यक्तिमत्त्वांच्या जयंतीनिमित्त अशा तऱ्हेचे विधायक उपक्रम राबवावेत, असे आवाहन पक्षाच्या महासचिव ज्योती बडेकर यांनी केले आहे. नुकतेच एका गंभीर आजारातून सुखरूप बाहेर आलेल्या सुषमा शिंदे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. या वेळी सतीश सत्ते, राजा आदाटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच जनता दलाचे राज्य महासचिव रवी भिलाणे, ज्योती बडेकर, काशिनाथ निकाळजे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री दीपाली बडेकर, प्रशांत राणे, प्रकाश कांबळे, रेणू भालेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पोलिसांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर
मुंबादेवी, ता. १३ (बातमीदार) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन सुविधा व आस्थापना विभागातर्फे लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाणे येथे रविवारी (ता. १२) वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भायखळा येथील बालाजी हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकातील डॉक्टर्स, नर्सेस आणि सहकारी स्टाफ यांनी यात सहभाग घेतला. लोकमान्य टिळक मार्ग ठाण्यातील ८० पोलिसांनी या शिबिरात उपस्थित राहून रक्तदाब, मधुमेह आणि ईसीजी तपासणी करून घेतली. मनसेचे कुलाबा विभाग अध्यक्ष शेखर गव्हाणे, दिनेश साठविलकर, प्रवीण पाष्टे, महेश टिल्लू, दीपक शिगवन, अरुण बोरुले, नंदकुमार भोसले यांनी विशेष परिश्रम घेत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी केले.

मुलुंडमध्ये मान्सूनपूर्व कामाची तयारी
मुलुंड, ता. १३ (बातमीदार) ः यंदाच्या मान्सूनमध्ये पाण्याचा निचरा योग्‍य प्रकारे होण्यासाठी टी विभाग महापालिकेतर्फे मुलुंडमध्ये गटारे आणि नाल्याची सफाई हाती घेण्यात आली आहे. या कामाचा प्रारंभ मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मुलुंड पश्चिमेतील हनुमानपाडा मराठी शाळा, गणेशपाडा साईबाबा मंदिर, न्यू राहुल नगर साईबाबा मंदिर, इंदिरा नगर क्रमांक १, २, ३, जवाहरलाल नेहरू रोड, सिद्धार्थ नगर, गौतम नगर, दीनदयाळ उपाध्याय मार्ग आदी ठिकाणी गटारे आणि नाल्याच्या दुरुस्तीचे आणि लादीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यात येतील, असे आमदार मिहिर कोटेचा यांनी या वेळी सांगितले.

चुनाभट्टीत रक्तदान शिबिर
चेंबूर, ता. १३ (बातमीदार) ः चुनाभट्टी येथील द बॉम्बे कॅथलिक सभा, एन हेल्थ अवतरीच ग्रुप आर लेडी ऑफ गुड कौन्सिल सायन युनिट यांच्या वतीने रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते. या वेळी शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे आयोजक ए. डिसोझा यांनी उपस्थित रक्तदात्यांचे आभार मानले.

विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान
शिवडी, ता. १३ (बातमीदार) ः जागतिक महिला दिनाच्या औचित्याने पवई येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्‍या पवई मराठी माध्यमिक शाळेत सोमवारी (ता. १३) सामाजिक कार्यकर्ते भूषण पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा शाल, सन्मानचिन्ह व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान, महिलांना सामाजिक आणि जागतिक महिला दिनाबाबत महत्त्वाचे प्रबोधन करण्यात आले. या वेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com