चांदिवलीत शिवसेना शाखेचे उदघाटन

चांदिवलीत शिवसेना शाखेचे उदघाटन

घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) ः शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदीवली विधानसभा शाखा क्रमांक १६१ चे उद्‌घाटन मंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. साकीनाका, साईबाबा सोसायटी, एलबीएस नगर ९० फूट रोड येथील या शाखेच्‍या उद्‌घाटनप्रसंगी आमदार दिलीप लांडे यांच्यासह महिला विभागप्रमुख चंद्रप्रभा मोरे, उपविभागप्रमुख राजेंद्र पाटील, श्वेता मसुरकर, शाखाप्रमुख राजू फडतरे, युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य प्रयाग लांडे, क्रांती राणे आदी मान्‍यवरांसह शिवसैनिक उपस्थित होते.

नॅशनल इंग्लिश हायस्कूलमध्ये बालमहोत्सव
मानखुर्द, ता. १४ (बातमीदार) ः मानखुर्दच्या नॅशनल इंग्लिश हायस्कूलमध्ये बालमहोत्सव नुकताच पार पडला. यादरम्‍यान अठराव्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजनही करण्यात आले होते. देशभर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे मागील २ वर्षे हे आयोजन होऊ शकले नव्हते. त्यामुळे या वर्षी मोठ्या उत्साहात करण्यात आलेल्या आयोजनामध्ये ‘एंटरटेन्मेंट बॅक वुईथ बँग’ ही संकल्पना राबवण्यात आली. नृत्यदिग्दर्शक शशी सागरे व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील कलाविष्कार सादर केले. या वेळी शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्याध्यापक सज्जाद मापारी यांची ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक योगेश सानप, शाळेतील शिक्षक व पालकांनी मेहनत घेतली. संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुनील भोवते यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि शासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले.

संत कक्कया मार्ग दुरुस्तीची मागणी
धारावी, ता. १४ (बातमीदार) : धारावीतील अंतर्गत रस्त्यांपैकी एक असलेल्या संत कक्कया मार्गावर पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम जवळपास दोन महिन्यांपासून केले जात होते. या मार्गावर खोदून ठेवलेला रस्ता साधी खडी टाकून बुजवला आहे. यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे स्थानिक रहिवासी, पादचारी व दुकानदारांना धुळीचा त्रास नाहक सहन करावा लागत आहे. यामुळे पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत समाजसेवक गिरीराज शेरखाने यांनी लेखी तक्रार पालिकेकडे केली असून पालिकेने यात लक्ष घालून रस्ता दुरुस्त करून घेण्याची मागणी दगडी बिल्डिंग येथील रहिवासी सचिन चौगुले यांनी केली आहे.

मुलुंड महोत्सवाची तयारी
मुलुंड, ता. १४ (बातमीदार) ः ‘मी मुलुंडकर प्रतिष्ठान’तर्फे आयोजित ‘मुलुंड महोत्सव’ची तयारी सुरू झाली आहे. राजे संभाजी मैदान, अरुणोदय नगर, येथे १८ ते २२ मार्चदरम्यान संध्याकाळी ६.३० वाजता हा महोत्‍सव साजरा होणार आहे. १९ मार्चला ‘नृत्यरंगावली’; २० मार्चला ‘गीतरामायण’; २१ मार्चला समीर लिमये यांचे कॉर्पोरेट कीर्तन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवाच्या शेवटच्‍या दिवशी महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवाला प्रवेश मोफत असून सर्व नागरिकांनी त्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक राहुल बाणावली यांनी केले आहे.

‘शिमगोत्सव’ माहितीपटाचा कोकणात प्रीमियर
मुंबई ः कोकणच्या होळी सणाची सांस्कृतिक माहिती सांगणारा ‘शिमगोत्सव’ या माहितीपटाचा प्रीमियर होळीच्या दिवशी वांद्री, उक्षी व आंबेड गावातील मान्यवर, ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या माहितीपटाला आतापर्यंत विविध फेस्टिवलमध्ये गौरवण्यात आले आहे. आशिष निनगुरकर लिखित व दिग्दर्शित या माहितीपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून अनेक पुरस्कार या माहितीपटाला प्राप्त झाले आहेत. सिद्धेश दळवी व प्रतिश सोनवणे यांनी या माहितीपटाच्‍या छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे. अभिनेते प्रदीप कडू व सुनील चौपाल इतर तंत्रज्ञांनी साथीने झालेल्या या माहितीपटाचे संकलन स्वप्नील जाधव यांनी केले असून संदीप डांगे यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.

महिला आर्थिक सक्षमीकरणविषयक जनजागृती
भांडुप, ता. १४ (बातमीदार) ः महिला दिनाचे औचित्य साधून स्कॉलस्टिक फाऊंडेशन भांडुप पश्चिम परिसरात महिलांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी स्कॉलस्टिक फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रसाद बोऱ्हाडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी ॲड. प्रांजन जाधव यांनी महिला बचत गट याबाबत मार्गदर्शन केले. तसेच संध्या सुर्वे यांनी गुंतवणूक व्यवस्थापन आणि आरती बनसोडे यांनी महिलांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनाचा समतोल राखण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिलांना सुरक्षेबाबत प्रात्यक्षिक सादर करून स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. त्‍यानंतर हळदी-कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला व महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद बोऱ्हाडे, ॲड. धनंजय भोसले, राहुल सावंत, भक्ती भाटे, सुनील साळुंखे आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com