आज कारवाई उद्या बस्तान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज कारवाई उद्या बस्तान
आज कारवाई उद्या बस्तान

आज कारवाई उद्या बस्तान

sakal_logo
By

नीलेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
घाटकोपर, ता. १४ ः पदपथ, सार्वजनिक रस्ते, शाळा, दवाखाने यांना वेढा घालून बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग वेळोवेळी कारवाई करतो; मात्र कारवाई करूनदेखील अनधिकृत फेरीवाले पुन्हा त्याच जोमाने फुटपाथ गिळंकृत करत आपले बस्तान मांडताना दिसतात. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून होणाऱ्या कारवाईचा फेरीवाल्यांवर अंकुश आहे का, असा सवाल नागरिक करत आहेत.
पालिकेच्‍या एन वॉर्ड कार्यालयाच्‍या हाकेवर असणाऱ्या पश्चिमेतील खोत लेन मार्ग, एम. जी. रोड, स्टेशन रोड हे मुख्य रस्ते फेरीवाल्‍यांनी गिळंकृत केले असूनही तेथील फेरीवाले पालिकेच्‍या कारवाईला ठेंगा दाखवत असल्‍याने नागरिकांनी संताप व्‍यक्‍त केला आहे. या रस्त्यावर फेरीवाल्‍यांमुळे वाहनांची मोठी कोंडी होत असते. या प्रमुख रस्त्यावरील एकही पदपथ नागरिकांना चालण्यासाठी उपयुक्त ठरत नसल्याने नागरिक येथील फेरीवाल्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वारंवार करत आहे.

अतिक्रमण विभागाची ७० अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाकडून सहायक आयुक्त संजय सोनवणे यांच्या नेतृत्त्‍वाखाली खोत लेन मार्गावरील ७० अनधिकृत फेरीवाल्यांवर सोमवारी (ता. १३) धडक कारवाई करण्यात आली. या मार्गावरील पदपथावर फेरीवाल्यांनी मोठमोठे बांबू, ताडपत्री टाकून रस्ता वेढल्याने येथील सर्वोदय दवाखाना व आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी रुग्णांना, डॉक्टरांना व कर्मचारी यांना ये-जा करणे अवघड होत होते. उपलब्ध तक्रारीवरून पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने ७० दुकाने निष्कासित केली व माल जप्त केला.

आज कारवाई; उद्या बस्तान
घाटकोपर पूर्व पेक्षा पश्चिममध्ये अनधिकृत फेरीवाले वाढल्याने पश्चिमेकडील स्टेशन रोड, महात्मा गांधी रोड (एम. जी. रोड), खोत लेन रोडवर महापालिका सातत्याने कारवाई करत असूनही फेरीवाले पुन्हा त्याच जोमाने दुसऱ्या दिवशी फूटपाथवर आपले बस्तान मांडतात. त्‍यामुळे पालिकेच्‍या कारवाईला फेरीवाले ठेंगा दावत असल्‍याचे बोलले जाते.

या रस्त्यांवर अडचण
एम. जी. रोड ः घाटकोपर पश्चिमेला एम. जी. रोड हा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी मुख्य मार्ग आहे. सायंकाळी चारनंतर हा मार्ग फेरीवाल्यांनी वेढला जातो. त्‍यामुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. फेरीवाल्‍यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने सायंकाळी या भागात ध्वनी तसेच वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते.

स्टेशन रोड ः पश्चिममधील या मार्गावर हिंदूसभा रुग्णालय, जीवनज्योत रुग्णालय, पोस्ट खाते आहे. हा रस्‍ताही फेरीवाल्यांनी वेढला आहे. फेरीवाल्यांमुळे येथे गर्दी वाढत असल्याने वाहतूक कोंडी तर होतेच; मात्र रुग्णवाहिकेलादेखील अनेक वेळा ताटकळत उभे राहावे लागते. याचा त्रास रेल्‍वे प्रवासी तसेच रुग्णांनाही होतो.

खोत लेन मार्ग ः सर्वोदय दवाखाना, आरोग्य केंद्र व पालिका शाळा असलेल्‍या या मार्गावर अनेक वर्षांपासून फेरीवाल्‍यांनी आपले बस्तान मांडले आहे. येथील पालिकेच्या शाळेबाहेर तसेच सर्वोदय दवाखान्याबाहेर फेरीवाले वाढले असल्याने येथून वाहतूक करताना अडथळा होतोच; मात्र शाळेतील विद्यार्थी व पालक तसेच दावाखन्‍यात ये-जा करणाऱ्या रुग्णांना, डॉक्टर व कर्मचारी यांना वारंवार त्रास सहन करावा लागतो.

पालिकेकडून वारंवार कारवाई सुरूच आहे. पदपथांवर बांबू ठोकून बसलेल्‍या फेरीवाल्‍यांवर कारवाई करून त्यांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई सातत्याने सुरूच राहणार आहे.
- संजय सोनवणे, सहायक आयुक्त, एन वॉर्ड