नगरसेवक निधीला अर्थसंकल्पात चाप

नगरसेवक निधीला अर्थसंकल्पात चाप

भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात या वेळी नगरसेवक निधीला चाप बसला आहे. नियमानुसार व शासन आदेशानुसार आवश्यक तेवढाच नगरसेवक निधी यावर्षीच्या अर्थसंकल्पात आयुक्तांनी राखीव ठेवला आहे. प्रशासनाकडून अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येत असलेल्या नगरसेवक निधीत महासभेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येते; मात्र सध्या नगरसेवकांची मुदत संपुष्टात आली असल्यामुळे महासभाच अस्तित्वात नाही. परिणामी, आयुक्तांनी नगरसेवक निधीसाठी नियमानुसार तरतूद केलेला निधीच अंतिम ठरणार आहे. यंदा अर्थसंकल्पात नगरसेवक निधीसाठी सोळा कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

नगरसेवक निधीतून आपापल्या प्रभागात कोणती लोकोपयोगी कामे करायची याची शिफारस नगरसेवक प्रशासनाकडे करतात आणि त्याप्रमाणे विकासकामे केली जातात. परंतु, अनेकवेळा नगरसेवक निधीचा अनावश्यक वापर होत असल्याचेही दिसून येत असते. वास्तविक महापालिकेच्या महसुली उत्पन्नाच्या दोन टक्के एवढा निधी नगरसेवक निधी म्हणून राखीव ठेवण्याचा नियम आहे आणि तसे शासन आदेशही आहेत. मात्र, हे नियम बाजूला ठेवत गेल्या काही वर्षांपासून सत्ताधारी इच्छेनुसार नगरसेवक निधीत भरमसाठ वाढ करवून घेत असत.
यंदा मात्र नियमानुसार महसुली उत्पन्नाच्या दोन टक्के एवढाच म्हणजे सोळा कोटी रुपयांचा निधी नगरसेवक निधी म्हणून अर्थसंकल्पात राखीव ठेवण्यात आला आहे.
---------------------------------
गतवर्षी पंधरा कोटींची तरतूद
गेल्यावर्षी प्रशासनाने नगरसेवक निधीसाठी पंधरा कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. मात्र महासभेत संख्याबळाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी या निधीत वाढ करुन तो २५ कोटीवर नेला होता. यावर आमदार गीता जैन यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. शासन आदेशानुसार उत्पन्नाच्या केवळ दोन टक्के इतकाच निधी नगरसेवक निधी म्हणून ठेवणे बंधनकारक आहे. असे असताना केलेली वाढ बेकायदा असून, ती रद्द करण्यात यावी अशी मागणी जैन यांनी आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे केली होती. त्यानंतर आयुक्तांनी निधीतील वाढ रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला व वाढीव नगरसेवक निधी रद्द केला.
-------------------------------
महापौर निधीतही कपात
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात महापौर स्वेच्छा निधीसाठी ४.५ कोटी, उपमहापौर स्वेच्छा निधीसाठी ४ कोटी, स्थायी समिती सभापती स्वेच्छा निधीसाठी ३.५० कोटी, सभागृह नेता स्वेच्छा निधीसाठी १.५ कोटी, विरोधी पक्षनेता स्वेच्छा निधीसाठी एक कोटी रुपये महासभेने राखीव ठेवले होते. वास्तविक नियमानुसार यापैकी केवळ महापौर निधीसाठीच तरतूद करता येते. त्यामुळे या निधीतही आयुक्तांनी कपात केली असून यावेळच्या अर्थसंकल्पात या सर्व निधीसाठी अगदी नाममात्र तरतूद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com