वर्सोवा विरार सागरीसेतू पालघरपर्यंत

वर्सोवा विरार सागरीसेतू पालघरपर्यंत

मुंबई अधिक जवळ
‘एमएमआरडीए’च्या नव्या प्रकल्पांमुळे वेगवान प्रवास

मुंबई, ता. १५ ः मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत विकासकामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या २०२३-२४ वर्षाच्या २८,१०४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. महामुंबई क्षेत्रातील नागरिकांचा मुंबईपर्यंतचा प्रवास सुसाट व्हावा म्हणून वर्सोवा ते विरार सागरी सेतू पालघरपर्यंत वाढविणे, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग पाच उल्हासनगरपर्यंत नेणे, ठाणे-बोरिवली दुपदरी भुयारी मार्गाच्या खर्चास मंजुरी, बाळकूम ते गायमुख ठाणे खाडी मार्ग प्रकल्पाच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी, पूर्व मुक्त मार्गाचा ठाण्यापर्यंत विस्तार इत्यादी महत्त्वाचे निर्णय ‘एमएमआरडीए’ने नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतले आहेत.

‘एमएमआरडीए’च्या नुकत्याच झालेल्या १५४ व्या बैठकीत विकास प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. सागरी सेतूच्या विस्तारासाठी प्रथम ‘एमएमआरडीए’कडून विरार ते पालघरपर्यंतची व्यवहार्यता तपासण्यात येणार आहे. सध्याचा कोस्टल रोड विरारपर्यंतच करण्याचे नियोजन आहे. सध्या पालघरपासूनच्या प्रवाशांना मुंबईत येण्यासाठी केवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गाचाच पर्याय आहे. तिथे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, आता प्रवाशांना नवा वेगवान पर्याय उपलब्ध होईल.

नरिमन पॉईंट ते पालघर दीड तासात
वर्सोवा-विरार सागरी सेतू ४२ किलोमीटरचा असून त्यासाठी ६३ हजार ४२६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. मागील वर्षीच त्याबाबतचा प्रकल्प एमएसआरडीसीकडून एमएमआरडीएकडे सोपविण्यात आला. त्यामुळे नरिमन पॉईंट ते पालघर प्रवास जेमतेम एक ते दीड तासात करता येईल.

उल्लेखनीय प्रकल्प
- वर्सोवा-विरार सागरी सेतू पालघरपर्यंत
- ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेचा विस्तार उल्हासनगरपर्यंत
- पूर्वमुक्त मार्गाचा ठाण्यापर्यंत विस्तार
- बहुचर्चित ठाणे ते बोरिवली भूमिगत मार्गाच्या खर्चासही मान्यता
- बाळकूम ते गायमुख ठाणे खाडी मार्ग प्रकल्पाच्या सुधारित प्रस्तावासही मंजुरी
- पूर्वमुक्त मार्गाचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी. सध्या हा मार्ग घाटकोपर-चेंबूर ते ऑरेंज गेटपर्यंत आहे. ऑरेंज गेटपासून पुन्हा प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. ते टाळून नरिमन पॉईंटपर्यंत सहजतेने जाता यावे, यासाठी ३.८ किलोमीटरच्या ऑरेंज गेट ते नरिमन पॉईंट भुयारी मार्ग प्रकल्पासही मंजुरी. लवकरच त्याचे काम सुरू होईल.

बीकेसी भूखंडांचा ई-लिलाव
वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील जी ब्लॉकमधील सी १३ आणि सी १४ अशा दोन भूखंडांच्या ई-लिलावासही मंजुरी देण्यात आली आहे. ई-निविदा जारी करत त्यांची विक्री केली जाणार असून त्यातून एमएमआरडीएला कोट्यवधी रुपये मिळतील.

सीएसटीपासून उल्हासनगरपर्यंत मेट्रो
- ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाचा खडकपाडामार्गे उल्हासनगरपर्यंत विस्तार केला जाईल. उल्हासनगर मध्य रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आणि व्यापारी केंद्र असल्यामुळे तेथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
- ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ सुमारे २५ किलोमीटर लांबीची असून तिला साडेआठ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यावर १७ स्थानके असून सध्या ठाणे ते भिवंडी टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यानंतर भिवंडी-कल्याण अशा दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होईल.
- कल्याण ते खडकपाडा आणि खडकपाडा ते उल्हासनगर असा साडेसात किलोमीटरचा मार्ग दोन टप्प्यांत बांधण्यात येईल. उल्हानगरपर्यंत मेट्रो गेल्यावर फोर्टपासून थेट उल्हानगरपर्यंत जाता येणार आहे. त्यासाठी फोर्ट-वडाळा मेट्रो ११, वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ आणि तेथून ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हानगर असा प्रवास करावा लागेल.

अर्थसंकल्पात वाहतूक व्यवस्थेसाठी मोठी तरतूद
- एकूण तरतूद ः २८,१०४ कोटी
- शिवडी-चिर्ले पूल ः १४,३३६ कोटी
- सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातील पहिला टप्पा ः १,९७७ कोटी
- ऐरोली ते काटई रस्ता ः १,४४१ कोटी
- मोटागाव ते माणकोली पूल ः २२३ कोटी

प्रकल्पांसाठीच्या तरतुदी
- ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग ः ३,००० कोटी रु.
- ठाणे तीनहात नाका वाहतूक सुधार ः १०० कोटी रु.
- बाळकूम ते गायमुख सागरी किनारा मार्ग ः ५०० कोटी रु.
- पालघर रस्ते व अन्य विकासकामे ः १००० कोटी रु.
- भिवंडी रस्ते विकास ः २५ कोटी रु.
- पूर्वमुक्त मार्गाचा ठाण्यापर्यंत विस्तार ः ५०० कोटी रु.
- कल्याण बाह्यवळण रस्ता ः १५० कोटी रु.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com