टि-शर्टवर नाव न छापल्याच्या रागातून दोघांवर प्राणघातक हल्ला

टि-शर्टवर नाव न छापल्याच्या रागातून दोघांवर प्राणघातक हल्ला

नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : टी-शर्टवर नाव न छापल्याच्या रागातून कोपरखैरणेतील भाजपच्या पदाधिकारी व त्याच्या सहकाऱ्यांनी दोघा तरुणांवर चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री कोपरखैरणे सेक्टर- १६ मध्ये घडली. या हल्ल्यात आविष्कार पार्टे (वय १८) व साहिल खरुशे (वय १९) हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणात सहा मारेकऱ्यांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सुनील किंद्रे, लखन किंद्रे, सागर किंद्रे, वैष्णव किंद्रे, अनुज घोलप आणि रोहित पाटील या सहा जणांचा समावेश असून हे सर्व जण कोपरखैरणेमध्ये राहण्यास आहेत. यातील सुनील किंद्रे हा भाजपचा पदाधिकारी असून साहिल खरुशे व त्याचे सहकारी प्रत्येक वर्षी सुनील किंद्रे याचे नाव टी शर्टवर छापत होते; मात्र या वर्षी साहिल आणि त्यांच्या ग्रुपने सुनील किंद्रे याचे टी-शर्टवर नाव न छापल्याने सुनील किंद्रे याला राग आला होता. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास साहिल खरुशे व त्याचा मित्र आविष्कार पार्टे हे दोघे कोपरखैरणे सेक्टर-१६ मधील ज्युपिटर फार्मा मेडिकलजवळ गेले असता त्या ठिकाणी सुनील किंद्रे व त्याचे सहकारीदेखील गेले होते. या वेळी हा वाद उफाळून आला व या वादाचे पर्यवसान हाणामारीत होत सुनील किंद्रे व त्याच्या पाच सहकाऱ्यांनी साहिल आणि आविष्कार या दोघांवर चॉपरने हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाल्यानंतर सर्व मारेकऱ्यांनी पलायन केले. या मारहाणीत जखमी झालेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून आविष्कार पार्टे याची प्रकृती चिंताजन असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय भोसले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com