‘शैक्षणिक जाहिरातींसाठी मार्गदर्शक तत्त्वे’

‘शैक्षणिक जाहिरातींसाठी मार्गदर्शक तत्त्वे’

मुंबई, ता. १५ : ‘ॲडव्हर्टायजिंग स्टॅण्डर्डस् कौन्सिल ऑफ इंडियाने शैक्षणिक जाहिरातींसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये’ बदल करण्याची शिफारस केली असून यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत.

विद्यापीठांपासून, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसपर्यंत सर्व संस्थांना तसेच एड-टेक प्लॅटफॉर्म्सना नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील. या जाहिरातींमध्ये सत्य तर असलेच पाहिजे; शिवाय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, मानसिक किंवा नैतिक ताण निर्माण करणारे अथवा त्यांच्या असुरक्षित भावनेचा फायदा घेणारे संदेश या जाहिरातींमध्ये नसावेत, असे कौन्सिलचे म्हणणे आहे. या क्षेत्रातील मार्केटिंग संवाद हा प्रामाणिक असणे खूपच महत्त्वाचे आहे. या संस्थांच्या जाहिरातींतील चित्रण व आशयामुळे ग्राहकांना कोणतेही नुकसान पोहोचता कामा नये, असे कौन्सिलचे मत आहे.
या क्षेत्राद्वारे तयार केल्या जाणाऱ्या जाहिरातींमुळे विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा पोहोचता कामा नये. तसेच जाहिरातींमध्ये केलेल्या दाव्यांची ठोस पुराव्यांसह पुष्टी करणे या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शिक्षण संस्थांसाठी आवश्यक ठरेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या लिंगाच्या किंवा रूपाच्या आधारे साचेबद्ध केले जाणार नाही, तसेच कमी गुण प्राप्त करणाऱ्यांचे चित्रण अयशस्वी किंवा अपयशी म्हणून केले जाणार नाही, याची खातरजमा नवीन मार्गदर्शक तत्त्वांद्वारे केली जाईल. कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्रण या जाहिरातींमध्ये मनोधैर्य खालावलेले असे होऊ नये. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा विचार करतानाच त्यांच्या शारीरिक आरोग्याचाही विचार केला जाईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी झोप किंवा भुकेची तमा बाळगली नाही, अशा चुकीच्या सवयींना उत्तेजन देणारे काहीही जाहिरातींमध्ये दाखवले जाऊ नये, असे एएससीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व महासचिव मनीषा कपूर म्हणाल्या.

---------
जाहिरातींच्या आधारे निवड
ॲडव्हर्टायजिंग स्टॅण्डर्डस् कौन्सिल ऑफ इंडियाने या वर्षात कारवाई केलेल्या आक्षेपार्ह जाहिरातींमध्ये शिक्षण क्षेत्रातील जाहिरातींचे प्रमाण २७ टक्के होते. ४९ टक्के पालक एडटेक प्लॅटफॉर्मची निवड जाहिरातींच्या आधारे करतात, असे कौन्सिलला दिसून आले आहे. त्यामुळे शैक्षणिक चौकट मजबूत राखण्यासाठी या जाहिरातींचे नियमन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे कौन्सिलचे मत झाले आहे.


----------
१५ एप्रिलपर्यंत नोंदवा मते
शैक्षणिक जाहिरातींसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांवर १५ एप्रिल, २०२३ पर्यंत जनतेला आपली मते नोंदवता येतील. आपली मते नोंदविण्यासाठी contact@ascionline.in व मार्गदर्शक तत्त्वांमधील प्रस्तावित बदल पाहण्यासाठी https://ascionline.in/education-guidelines.pdf या संकेतस्थळाला भेट देऊ शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com