कुर्ल्याची उद्योगांची जागा 
बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव

कुर्ल्याची उद्योगांची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव

मुंबई, ता. १६ : कुर्ला-कमानी भागातील ६० वर्षे जुन्या उद्योग गाळ्यांची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचे कारस्थान स्थानिक अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या साह्याने केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. हा विषय आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला. काळे मार्गावरील भारत कोल कंपाऊंड येथील शंभर लघुद्योग गाळ्यांमध्ये साडेचार हजार कामगार काम करीत असून त्यावर त्यांच्या २० हजार कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होतो. ही जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी स्थानिक महापालिका व पोलिस अधिकारी संगनमताने गाळेधारकांवर दबाव आणत आहेत, असा आरोप पटोले यांनी केला. राज्य सरकारने या कामगार आणि उद्योजकांना वाचवावे आणि पालिकेचे भ्रष्ट अधिकारी, पोलिस आणि बिल्डरवर कारवाई करावी, अशी मागणी पटोले यांनी विधानसभेत केली.
अधिकाधिक लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी सरकार विविध योजनांची घोषणा करते; परंतु दुर्दैवाने सरकारी अधिकारी आणि त्यांच्याशी संबंधित बिल्डरांनी हे उद्योग बंद करून जागा बिल्डरला देण्याचा डाव आखला आहे, असाही आरोप त्यांनी केला. मागील आठवड्यात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वात चार ते पाच हजार कामगारांनी निषेध मोर्चा काढून ‘उद्योग बचाव-कामगार बचाव’ सभा घेतली. बिल्डरशी करार करा, नाहीतर तुमच्यावर कठोर कार्यवाही होईल, अशी धमकी महापालिकेचे अधिकारी देत असल्याचा आरोप नसीम खान यांनी यावेळी केला. शिंदे सरकारने अशा छोट्या-मोठ्या उद्योजकांना व हजारो कामगारांना त्वरित संरक्षण द्यावे आणि महापालिका अधिकारी व साकीनाका पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com