
ग्लास फसाड इमारतीत मोकळी जागा बंधनकारक
मुंबई, ता. १६ ः मुंबईतील टोलेजंग ग्लास फसाड (बाहेरून काच असलेल्या) इमारतींत आगीचा भडका उडाल्यानंतर व्हेंटिलेशनची मोठी समस्या निर्माण होते. त्याची दखल घेऊन विकास नियोजन आराखडा २०३४ मध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यात नव्याने होणाऱ्या ग्लास फसाड इमारतींत मोकळी जागा ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी हरकती-सूचना मागवण्यात आल्या असून एका महिन्यात आक्षेप नोंदवा, असे आवाहन पालिकेच्या नियोजन विभागाने केले आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षांत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या असून त्यात आगीच्या घटना घडल्या आहेत. हायराईज इमारतीत ग्लास फसाडचा वापर केला जातो. आग लागल्यास ग्लास फसाडमुळे व्हेंटिलेशनची मोठी समस्या निर्माण होते. कृत्रिम प्रकाश योजना आणि यांत्रिक वायुवीजनाचा वापर असलेल्या आणि बाह्य दर्शनी भाग काचेने बांधलेल्या इमारतींच्या मागील बाजूला मोकळ्या जागा ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईकरांच्या हरकती-सूचना मागवण्यात आल्या असून त्यावर अंतिम निर्णय नगर विकास विभाग घेईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.