सराफाला लुटणाऱ्याला नागरिकांकडून चोप

सराफाला लुटणाऱ्याला नागरिकांकडून चोप

पनवेल, ता. १७ (वार्ताहर) : दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने खांदा कॉलनीतील ज्वेलर्सच्या सोनारावर चाकू हल्ला करण्यात आला. यानंतर लाखो रुपयांचे दागिने घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुखविंदर जसबीरसिंग धामी (३२) या लुटारूला नागरिकांनी पकडून चोप दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना खांदा कॉलनी सेक्टर ६ भागात घडली. या घटनेत सोनार आणि लुटारू दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुकेश जैन यांचे खांदा कॉलनी सेक्टर ८ मध्ये ‘विजय श्री’ नावाची ज्वेलर्स पेढी आहे. बुधवारी (ता. १५) रात्री आरोपी सुखविंदर धामी हा जैन यांच्या दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने गेला होता. त्याने सोन्याच्या तीन चेन पसंत केल्यानंतर सदर दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जैन यांनी त्याला अडवल्यानंतर त्याने जैन यांच्यावर चाकू हल्ला केला. त्यानंतर तो तीन चेन घेऊन पळून जाताना, जैन यांनी आरडा-ओरड केली. त्यामुळे त्या भागातील नागरिकांनी आरोपी सुखविंदर धामी याला पकडून मारहाण केली. त्यानंतर त्याला खांदेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले. धामी आणि त्याला मारहाण करणाऱ्या नागरिकांविरोधात खांदेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कर्जाच्या पैशांसाठी नातेवाईकांचा तगादा
सुखविंदर धामी हा कळंबोली येथे राहण्यास असून तो डीजे ऑपरेटरचे काम करतो. चार वर्षांपूर्वी त्याचा प्रेमविवाह झाला होता. त्यावेळी त्याने नातेवाईकांकडून चार लाख रुपये व्याजाने घेतले होते. तसेच मित्रांकडून ८० हजार रुपये उसने घेतले होते. या कर्जदारांकडून त्याच्याकडे वारंवार पैशांची मागणी होत होती. मात्र त्याला कर्जाने घेतलेले उसने पैसे परत करता येत नव्हते. त्यातच त्याला काम-धंदा नसल्यामुळे तो तणावाखाली आला होता. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने जाऊन तेथील दागिने घेऊन पळून जाण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आल्यानंतर त्याने हा प्रकार केल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com