गुढी लहान.... 
आनंद महान...

गुढी लहान.... आनंद महान...

गुढी लहान....
आनंद महान...
पर्यावरणपूरक उत्‍सव साजरा करण्याला पसंती

अजित शेडगे, माणगाव
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याला नव उपक्रमांची, चांगल्‍या संकल्‍पांची सुरुवात केली जाते. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस महाराष्ट्रासह देशभरात विविध पद्धतीने साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्‍या दिवशी मराठी नववर्षाचे जल्‍लोषात स्‍वागत केले जाते.
विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाणारी गुढी घराघरांत उभारली जाते. कोकणात गुढी उभारण्यासाठी जंगलातील बांबूचा किंवा लाकडाचा उपयोग केला जातो. या दिवशी मोठ्या प्रमाणात बांबू, लाकूड तोड होत असल्‍याने गेल्‍या काही वर्षांत पर्यावरणपूरक गुढी उभारण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्‍यामुळे उंचीने लहान प्रतिकात्‍मक गुढ्यांना मागणी पसंती मिळत आहे. कमी जागेत घरात, कार्यालयात टेबलावर किंवा हॉलमध्येही ही गुढी उभारता येते. सुक्या लाकडापासून छोट्याशा पाटावर या गुढ्‌या तयार केल्‍या जातात. अवघ्‍या एक फुटापासून चार फुटांपर्यंत रेडिमेड गुढी मिळते. रेशमी, तलम वस्‍त्र, लहानसा तांब्‍या, कृत्रिम फुलांचा हार, पाने, माळा, साखरगाठी असा साज करून आकर्षक गुढ्या तयार केल्‍या जातात. अवघ्‍या १०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत त्‍या बाजारात उपलब्‍ध आहेत.

सुक्या लाकडाच्या काठीपासून लहान, आकर्षक गुढ्‌या तयार केल्‍या जातात. हाताळण्यास सोप्या आणि कुठेही त्‍या उभारतात येतात. शिवाय किंमतही वाजवी असल्‍याने ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
- नरेंद्र पेणकर, रेडिमेड गुढी विक्रेता

गुढी उभारणीसाठी बांबू किंवा मोठी काठी लागते. यामुळे पर्यावरणाची हानी होते. मात्र सध्या आकाराने लहान गुढींचा पर्याय उपलब्ध असून या गुढ्या घरात, टेबल, कार्यालयात, देवघरात कुठेही ठेवता येतात.
- दीपक ठाकूर, गुढीप्रेमी
.................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com