चिऊताई चिऊताई .... ये माझ्या अंगणी !

चिऊताई चिऊताई .... ये माझ्या अंगणी !

ठाणे, ता. १९ (वार्ताहर) : चिऊताई चिऊताई दार उघड... लहानपणी ही गोष्ट ऐकत आपण सर्व मोठे झालो आहोत; पण आता सकाळ उजाडताच कानावर ऐकू येणारा चिवचिवाट सिमेंटच्या जंगलात हरपू लागला आहे. शहरीकरण, प्रदूषण आणि गायब झालेल्या हिरवाईमुळे चिमण्यांचे अस्‍तित्‍व धोक्यात आले आहे. अशा वेळी चिमण्यांच्या संवर्धनासाठी ठाण्यातील ‘स्पॅरोताई फाऊंडेशन’ पुढे सरसावले असून, आपल्या पुढच्या पिढीलाही चिमणी दिसावी, यासाठी ‘चिऊताईसाठी एक घरटे अंगणी’ ही संकल्पना ती राबवत आहे. लहान वयापासूनच ही संवेदना मुलांमध्ये रुजावी, यासाठी २० मार्च चिमणी दिनानिमित्त स्पॅरोताई संस्था विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहे.
‘स्पॅरोताई फाऊंडेशन’द्वारे मागील १५ वर्षांपासून ‘चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा’ हा उपक्रम राबविला जात असून, याच मोहिमेच्या माध्यमातून निसर्गातील चिमणी वाचली पाहिजे, यासाठी जनजागृती करण्यात येते. ‘चिमणी वाचवा’ ही जनजागृती महाराष्ट्रातच नाही, तर कर्नाटक, गुजरात अशा अनेक राज्यातून ‘स्पॅरोताई फाऊंडेशन’ करीत असल्याची माहिती अध्यक्षा ज्योती राज परब यांनी दिली. निसर्गाचा आणि पर्यावरणाचा समतोल कायम राहावा, चिमण्या दिसल्या पाहिजेत, त्यांचा चिवचिवाट झाला पाहिजे म्हणून विशेष मोहीम हाती घेण्‍यात आली आहे.
--------------------------
शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
समाजात अधिकाधिक जनजागृती व्हावी, याकरिता दर वर्षी जागतिक चिमणी दिनानिमित्त रॅली काढण्यात येते. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाची जनजागृती करण्यात येते. देशाच्या भावी पिढीला तसेच विद्यार्थ्यांना याचे महत्त्‍व कळायला हवे, या हेतूने स्पॅरोताई फाऊंडेशनतर्फे आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येतो. २०१५-२०१६ मध्ये विद्यार्थ्यांनी एक हजार चिमण्यांची घरटी बनविण्याचा जागतिक विक्रम केला होता. याच अनुषंगाने बाकीच्या संस्थांनी देखील, असे उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे ज्योती परब यांनी सांगितले.
--------------------------
टाकाऊ वस्तूंपासून बनतात चिमणीच्या घरटी
घरटी बनविताना वह्यांचे पुठ्ठे, जाड पुठ्ठे, लाकडी बॅच, लाकडांचे वेस्टेज, नारळाची करवंटी, प्लास्टिक बाटली आदी टाकाऊ वस्तूंपासून चिमण्यांची घरटी तसेच फिडर बनविण्यात येतात. मातीच्या गुल्लकाला छिद्र करून चिमण्यांचे घरटे बनविण्यात येते. याच घरट्यात चिमण्यांचे संवर्धन करण्यासाठी त्यांना घरात शिजलेले अन्न खाऊ घालावे. चिमणी हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे.
-----------------------
चित्रकला स्पर्धा
स्पॅरोताई फाऊंडेशनद्वारे जनजागृती आणि चिमण्यांच्या घरटी बनविण्याच्या प्रात्यक्षिकासह चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध ठिकाणच्या २१ शाळांमधील तब्बल १०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत पहिला क्रमांक अनमोल विश्वकर्मा तर दुसरा क्रमांक देविका लिंगायत; तर तिसरा क्रमांक श्रिया वारीक हिने पटकाविला.
---------------------------------
माणसाच्या मनात निसर्गाबाबत आणि पक्षांबाबत प्रेम असायला हवे. मनात जागा असेल तर तुमच्या घरातदेखील चिमणीसाठी जागा करता येईल. पर्यावरणासाठी चिमणी वाचलीच पाहिजे, म्हणूनच जनजागृती करण्यात येत आहे.
- ज्योती परब, अध्यक्षा, स्पॅरोताई फाऊंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com