प्रवास अधिक सुखकर होणार

प्रवास अधिक सुखकर होणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : सर्वसामान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या नवीन साध्या बस लवकरच नव्या आरामदायक सुविधांसह प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा एसटी प्रवास आता आरामदायी होणार आहे. ७५ वर्षांत पहिल्यांदाच आरामदायी (पूशबॅक) आसने बसवण्याचा निर्णय एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी घेतला आहे.
शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध, शिवाई या गाड्यांमधील आरामदायी प्रवासानंतर साध्या गाड्यांमध्ये आरामदायी आसनावरून प्रवाशांना प्रवास करणे शक्य होणार असून तीन हजार बस नव्याने महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. सध्या दापोडीच्या मध्यवर्ती कार्यशाळेतून महिन्याला ६० बस बनवून पाठवण्यात येत आहेत. दापोडीस्थित एसटी मध्यवर्ती कार्यशाळेत ४५० साध्या बस, २०० हिरकणी (निमआराम) आणि ५० रातराणी (शयनयान) अशा एकूण ७०० बस गाड्यांची बांधणी करण्यात येत आहे. या गाड्यांसाठी चेसिस कार्यशाळेत उपलब्ध झालेल्या आहेत. साध्या गाड्यांपैकी १५० गाड्या संबंधित विभागांना रवाना करण्यात आल्या असून जून २०२३ अखेर या सर्व गाड्या प्रवासी सेवेत उपलब्ध होणार असल्याचे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.
...
बससेवेचे रूपडे पालटणार
राज्यात सध्या अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजनेनंतर लालपरीसाठी प्रवासी मागणी मोठ्या प्रमाणात आहे; मात्र बसची संख्या घटली आहे. परिणामी, आता एसटी महामंडळ प्रशासनाकडून जास्तीत जास्त साध्या बस सेवेत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. कार्यशाळेत बांधण्यात येणाऱ्या गाड्या वगळता अन्य दोन हजार साध्या गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून वर्षभरात एसटी बस सेवेचे रूपडे पालटणार असल्याचे शेखर चन्ने यांनी स्पष्ट केले.
...
सुरक्षित प्रवासावर भर
पूर्वी एसटीची बांधणी अॅल्युमिनियमची असायची, त्या बसचे अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता जास्त होती. त्यामुळे २०१६ पासून एसटीने सर्व गाड्या माईल्ड स्टीलमध्ये बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सध्या एसटीच्या ताफ्यातील ९० टक्के बस या माईल्ड स्टीलच्या बांधण्यात येत असल्याचे कार्यशाळा व्यवस्थापक द. गो. चिकोर्डे यांनी सांगितले.
...
स्लीपर रातराणी बस
सध्या एसटीच्या ताफ्यात रातराणी बस आहेत; मात्र त्यातील प्रवास फार आरामदायक नसल्याने प्रवाशांनी एसटीच्या रातराणीकडे पाठ फिरवली आहे. आता मात्र मध्यवर्ती कार्यशाळेत ५० रातराणी स्लीपर बसची बांधणी केली जात आहेत. त्यामुळे खासगी स्लीपर बसच्या तुलनेत एसटीच्या रातराणीची आरामदायक सेवा प्रवाशांना मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com