पावसाळ्यापूर्वीच्या आगोटला दरवाढीचा फटका

पावसाळ्यापूर्वीच्या आगोटला दरवाढीचा फटका

वाशी, ता. २० (बातमीदार)ः उन्हाळा सुरू झाल्यामुळे आता गृहिणींची आगोटची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात मसाल्यासाठीची तयारी सुरू झाली आहे; मात्र एकीकडे मसाल्यासाठी लागणारी लाल मिरची बाजारात कमी प्रमाणात येत आहे; तर दुसरीकडे मसाल्याचा रंग खुलवणारी काश्मिरी तर चव वाढवणारी संकेश्वरी मिरची कमी प्रमाणात बाजारात येत असल्याने मसाल्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात तापमानाचा पारा चढू लागला की वाशीतील घाऊक मसाला बाजारात मिरची आणि मसाल्याच्या पदार्थांची आवक वाढू लागते. या हंगामात बाजारात दिवसाला साधारण ८० ते १०० गाड्यांची मिरच्यांची आवक होत असते; मात्र हळूहळू परिस्थिती बदलली असून ऑनलाईनच्या जमान्यात ही आवक कमी कमी होत आहे. थेट पणनाचा कायदा आल्यानंतर बाजार खुले झाल्याने तर ही आवक दिवसाला अवघ्या ३० ते ४० गाड्यांवर आली. त्यातच या वर्षी मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरचीचे उत्पादन कमी असल्याने, बाजारात मिरची कमी प्रमाणात येत आहे. संपूर्ण हंगामात बाजारात मसाल्याच्या सात ते आठ लाख पोती मिरच्या बाजारात येतात. एका पोत्यात ४० ते ५० किलो मिरच्या असतात. मसाल्यासाठी मुख्यत: बेडगी, तेजा, संकेश्वरी, काश्मिरी या मिरच्या लागतात. त्यांच्याबरोबर अख्खा गरम मसालाही लागतो; अख्ख्या गरम मसाल्याचे दर स्थिर आहेत; मात्र मसाल्यात मुख्य घटक महागल्याने मसाल्याचा ठसका बसणार आहे.
-------------------------------
दरांमध्ये ३० ते ४० टक्यांनी वाढ
मिरचीची आवक महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमधूनही मोठ्या प्रमाणात होते. रेशमपट्टी या कमी तिखट मिरचीला गुजराती वर्गाकडून मागणी असते; मात्र यंदा उत्पादन कमी असल्याने बाजारातच कमी प्रमाणात मिरच्या उपलब्ध आहेत. परिणामी, सर्वच जातीच्या मिरच्यांचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढलेले दिसत आहेत.
--------------------------------
संक्रांतीनंतर बाजारात मिरच्यांची आवक सुरू होते; मात्र यंदा फार कमी प्रमाणात माल बाजारात आला आहे. त्यात संकेश्वरी मिरची तर खूपच कमी उपलब्ध आहे. त्यामुळे तिचे दर सर्वाधिक वाढले आहेत. मिरचीचा साठाच उपलब्ध नसल्याने ग्राहकांची मागणी पूर्ण करणे कठीण जात आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या मानाने यंदा दर वाढलेले आहेत.
- अमरीश बारोट, मिरची घाऊक व्यापारी
------------------------------------
मिरचीचे प्रकार दर (किलोमागे)
गेल्या वर्षी आता
लवंगी २०० ते २३० रु ४०० ते ४५० रु.

बेडगी ३३० ते ३५० रु. ५०० ते ६०० रु.

पांडी मिरची २२० ते २३० ३०० ते ३५० रु.

काश्मिरी मिरची ४५० रु. ६०० ते ६५० रु.

संकेश्वरी ४८० रु १००० ते १२०० रु.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com