नववर्ष स्वागतयात्रेचा उत्साह शिगेला

नववर्ष स्वागतयात्रेचा उत्साह शिगेला

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : गेल्‍या दोन ते अडीच वर्षांपासून घोंघावणाऱ्या कोरोनाच्या महामारी आजारामुळे सर्वच सणांवरती निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून, सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील स्वागतयात्रा काढण्याची उत्साहपूर्ण तयारी आयोजकांकडून सुरू आहे.
ठाण्यातील श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे आयोजित यंदाच्या नववर्ष गुढीपाडवा स्वागतयात्रेत विविध विषयांवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहेत. ‘समर्थ भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या रथांचा यात्रेत सहभाग असणार आहे. यंदाच्या स्वागतयात्रेचे २२ वे वर्ष आहे. स्वागत यात्रेचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉ. विनोद इंगळहळीकर आहेत. त्‍यांनी स्वागत यात्रेचे गीत आणि परिपूर्ण माहिती देणारे संकेतस्थळही तयार केले आहे. नववर्ष स्वागतयात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती असणार आहे.

शोभायात्रेत समाजप्रबोधनपर सांस्कृतिक विषयांवर जनजागृती करणारे देखावे साकारण्यात येत आहेत. त्यानुसार ठाण्यातील श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे आयोजित यंदाच्या नववर्ष गुढीपाडवा स्वागतयात्रेत पारंपरिक वेश करून १०० हुन अधिक महिलांची दुचाकी रॅली निघणार आहे. सायकलस्वार, मल्लखांब, ड्रम-झेंबे वादन, एरियल कसरती, प्लास्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि अवयवदानावर जनजागृती करणारे सुमारे ५० हून अधिक विविध विषयांवर चित्ररथ पाहायला मिळणार आहेत.
ऑनलाईन औषध खरेदीचे तोटे, साडेतीन शक्तिपीठांचा चित्ररथ, डॉ. बेडेकर विद्या मंदिराचा ‘माझी शाळा, मराठी शाळा’ यांसारखे नवे विषय असणाऱ्या चित्ररथांचा देखील समावेश असणार आहे. ज्युपिटर रुग्णालयाकडून वैद्यकीय कक्षाचे नियोजन करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील पारसी समाजाचे १५ ते २५ नागरिक पारंपरिक वेश करून यात्रेत सहभागी होणार आहे. संस्कार भारती या संस्थेतर्फे गावदेवी मैदान येथे १० हजार चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वागतयात्रेत सहभागी होणाऱ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा व सेल्फी विथ स्वागतयात्रा या स्पर्धांचे कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजन करण्यात आले आहे.
--------------------------------
मासुंदा तलाव परिसरात दीपोत्सव
मंगळवार २१ मार्च रोजी सायंकाळी ५.३० ते ७ यावेळेत गीता धर्म मंडळ, पुणे विद्यार्थ्यांचे भगवदगीता पठण असणार आहे. सायंकाळी ७ वाजता मासुंदा तलावाच्या परिसरात दीपोत्सव, स्वातंत्र्यदेवता आणि गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सायंकाळी ८.३० ते १० यावेळेत इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे हे उपस्थितांना ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
....................
महापालिकेच्या चित्ररथांचा समावेश
ठाणे महापालिकेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, शिक्षण विभाग, उद्यान विभाग, परिवहन विभाग, पाणीपुरवठा विभाग, ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड आणि प्रदूषण नियंत्रण विभाग यांचे चित्ररथ स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.
.................
सात उपयात्रा
नववर्ष स्वागत यात्रेत मुख्य यात्रेसह घोडबंदर रोड, वर्तक नगर, पोखरण, लोढा, लोकमान्यनगर, कोलशेत आणि कळवा अशा सात ठिकाणांहून उपस्वागतयात्रा काढण्यात येणार आहेत. शहरातील साठहून अधिक संस्था या यात्रेत सहभागी होत आहेत. अहिल्याबाई होळकर घाट येथे मातंग समाज, धनगर, बंजारा, उडपी समाज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा समाज, चित्पावन ब्राह्मण, रविदास, सीकेपी समाज, नौका विहार घाटाजवळ जीएसबी सारस्वत ब्राह्मण, लिंगायत, तेली, जैन समाज, गणेश घाटाजवळ (साईकृपा हॉटेल समोर) चर्मकार समाज, वाल्मिकी समाज, गुजराथी आणि पाचाळ समाज या विविध समाजाच्या वतीने गंगा आरती होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com