कोविड रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

कोविड रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : मुंबईतील कोविडरुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, गेल्या चार दिवसांत ७९ कोविड रुग्ण आढळले आहेत; तर संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय कोविड रुग्णांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार राज्यात १६ मार्चपर्यंत ९२६ रुग्ण होते, ही संख्या १९ मार्चला वाढून १,३०८ वर पोहोचली. याच कालावधीत मुंबईत २०० सक्रिय रुग्ण होते, ही संख्या वाढून २७९ वर पोहोचली आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या दिवसांत लोक प्रवास करत आहेत; तसेच अ‍ॅडिनोव्हायरस आणि एच३ एन२ सारख्या विषाणूजन्य संसर्गामुळेही मुंबईकर आजारी पडत आहेत. राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी हवामानातील सतत बदल आणि फ्लूच्या रुग्णांमध्ये ही महत्त्वाची कारणे आहेत, असे सांगितले. परिणामी फ्लू आणि कोविडसारखीच लक्षणे दाखवत असल्याने अनेक बाधित लोक आरटीपीसीआर चाचण्या करत आहेत. मुंबईत कोविड रुग्णांसाठी समर्पित चार हजार ३५१ खाटा आहेत. त्यापैकी फक्त सहा खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. यातील चार रुग्णांना आरोग्याच्या वेगवेगळ्या कारणांमुळे दुसऱ्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर सेव्हन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले; पण नंतर त्यांची चाचणी सकारात्मक आली.

हॉस्पिटलायझेशन एक टक्क्यांपेक्षा कमी
रुग्ण कोविडसाठी रुग्णालयांमध्ये आतापर्यंत थेट दाखल झालेले नाहीत. इतर उपचारादरम्यान चाचणी पॉझिटिव्ह येते आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरज एक टक्क्यापेक्षा कमी असते. सध्याच्या परिस्थितीत कोविडची लक्षणे केवळ दोन ते तीन दिवस टिकतात आणि रुग्ण मोठ्या उपचारांशिवाय लवकर बरा होतो; तर एन्फ्लूएंझा प्रकारात मोडणारा संसर्ग म्हणजेच ‘एच३ एन२’ आणि ‘एच१ एन१’मध्ये लक्षणे काही आठवडे राहतात आणि त्यांना न्यूमोनिया किंवा दुय्यम बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

पॉझिटिव्हिटीचा दर वाढला
मुंबईत शनिवारपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या २४६ नोंदवली होती; तसेच चाचणीचा पॉझिटिव्हिटी दर २.८६ टक्क्यांपर्यंत वाढला. १२ ते १८ मार्च दरम्यान ८,५८७ लोकांची कोविड चाचणी झाली त्यापैकी २४६ नमुने पॉझिटिव्ह आले. अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले, की कोविड रुग्णांमध्ये वाढ झाली असली, तरी घाबरून जाण्याची गरज नाही. कारण त्यापैकी बहुतेक रुग्णांना लक्षणे नसतात आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे.

कोविड, एन्फ्लूएंझा आणि विषाणूजन्य तापाच्या प्रकरणांमध्ये हवामानातील बदल आणि खराब हवेची गुणवत्ता महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नागरिकांनी सतर्क राहून लक्षणे शोधून स्वत: औषधोपचार करण्याऐवजी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शिवाय, संसर्ग होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क लावावेत.
- डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com